अवैध धंद्यांचा सुळसुळाट; रोडरोमिओंचा त्रास, गुन्ह्यांचा तपासच लागेना
सातारा, दि. 22 (प्रतिनिधी)
वडूज शहर आणि परिसरात छोट्या मोठ्या गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. बसस्थानकावर व परिसरातून जाणाऱ्या शालेय मुलींना टवाळखोरांचा सामना करावा लागत आहेत. मटका, दारू यासारख्या अनेक धंद्यांनी तर हाहाकार माजवला आहे. असे असताना वडूज पोलीस ठाण्याची गाडी केवळ वाळूसाठीच आपले कर्तव्य असल्याप्रमाणे भागातील नदी, नाले, ओढ्यावर फिरत असल्याचे सांगत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पोलिसांचा कारभार वाळूभोवती सुरू असल्याने फळकुटदादांची दहशत वाढली आहे. पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या पाच गुन्ह्यापैकी केवळ तीन, घरफोडीच्या 13 पैकी केवळ तीन गुन्ह्यांचा, चोरीच्या 42 गुन्ह्यांपैकी 27 गुन्ह्यांचा तपास लावला गेला आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने गुन्हेगारी बोकाळली आहे.
वैयक्तिक आणि टीमवर्क अशा दोन पध्दतीने कोणत्याही कामाचे स्वरूप ठरते. यात, टीमवर्क पध्दतीचे काम करताना प्रत्येक सहभागी व्यक्तीचे महत्त्व, गुण-दोष दुर्लक्षित करून चालत नाही. सर्व पातळ्यांवर कामाची भूक असेल तरच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होते. पोलिस दल हे मोठ्या टीमवर्कचा भाग आहे. व्यवस्थेने आणि कायद्याने बांधून ठेवलेल्या या मोठ्या समूहाला जबाबदारीची आणि अधिकारांची वाटणीदेखील करण्यात आली आहे. मात्र, अर्थकारण आणि वैयक्तिक हेवेदाव्यांमुळे “सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे बीद्र कोठेतरी कमी पडत असल्याचे वडूज पोलिसांच्या वागण्यावरून दिसते.
नदीपात्रात विविध सेटिंग्जच्या माध्यमातून गुन्हेगारीला खतपाणी देण्याची, गुन्हेगारी वाढवण्याची, किंवा फारच अंगाशी आले तर पळ काढत, “”साहेब मला वाचवा” म्हणत पोलीस ठाणे गाठायची सवय आता काही कर्मचाऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे.
वडूज परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू, ताडी, जुगार, क्लब, वाळू वाहतूक या व्यवसायामुळे तरुण पिढी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तर काहींच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. एवढे होऊनही पोलीस प्रशासनाकडून अशा धंद्यांवर ठोस कारवाई केली जात नाही, हे विशेष.
याच पोलीस ठाण्याच्या सीमावर्ती भागात बनावट दारूच्या व्यवसायामुळे पूर्ण परिसर ढवळून निघाला आहे. पोलिसांकडून अवैध व्यवसायाला मिळणारा सॉफ्ट कॉर्नर म्हणजे एकप्रकारे मदतच म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असा संतप्त आरोप करून,जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या कारभाराकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
अवैध व्यवसायाचा बोलबाला
वडूज पोलीस प्रशासनाचे अवैध व्यवसाय चालकांशी स्नेहपूर्ण व अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी गेल्या दहा महिन्यात जुगाराचे व दारूबंदीचे काही गुन्हे नोंदवले. मात्र, मोठे मासे जपायचे अन् छोटे मासे कारवाईच्या तेलात तळायचे असा खेळ करून केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. मात्र खऱ्या अर्थाने अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. सद्यःस्थितीत अवैध व्यवसायाचा बोलबाला दिसून येत आहे. तरीही याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
कारवाई साताऱ्यातून मग वडूज पोलीस नेमके करतात काय?
या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडवळे, सिध्देश्वर कुरोली या ठिकाणी पडलेले दरोडे हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले होते. तसेच कातरखटाव येथील क्लबवर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा मारला होता. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळूची सगळ्यात मोठी कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केली होती. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 15 घरफोड्या करणाऱ्यालाही एलसीबीने अटक केली. याच पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या दहा पैकी चार गुन्ह्यांचा तपास लागला आहे. तसेच इतरही काही गुन्ह्यांचा तपास अद्याप लावण्यात वडूज पोलिसांना यश आले नाही.
कारभाऱ्यांचा वचक राहीलाच नाही
वडूज पोलीस ठाण्याचे कारभारी अशोक पाटील यांचा स्वभाव अत्यंत शांत आहे, तसेच ते अनुभवी आहेत. मात्र, पोलीस ठाण्यात बरेच दिवस चिकटून बसलेल्यांनी नेमका त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतला आहे. काही धनाजीरावांनी चांगलेच बस्तान बसवले आहे. कधी स्वत:ची अडचण सांगून तर कधी साहेबांच्या व साताऱ्यातील एका बड्या अधिकाऱ्याच्या नावावर वाळू व्यवसाय करणाऱ्यांच्या खिशाला प्रेमाने हात घातला जात असल्याची चर्चा आहे. त्यांच्या उचापतीने वडूज परिसरात मात्र, नाराजीचा सुर आहे.