पिंपरी – सहा महिन्यांपासून मैत्रीण बोलत नसल्याच्या कारणावरून एका नायजेरियन नागरिकाने युगांडाची रहिवासी असलेल्या चार महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ मारली. यामुळे तिचा गर्भपात झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 33 वर्षीय महिलेने 24 जानेवारी 2020 रोजी औषधोपचार घेतल्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फ्रेड बोहो (रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1 ऑगस्ट 2019 ते 4 जानेवारी 2020 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली. युगांडा येथून शिक्षणासाठी आलेली महिला ही पिंपळे गुरव परिसरात “लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये एका व्यक्ती सोबत राहात होती. फ्रेड बोहो हा या महिलेची छेड काढत असे.
गेल्या सहा महिन्यांपासून पीडितेशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ती महिला बोलण्यास टाळाटाळ करत होती. याच रागातून रस्त्यात या दोघांचे भांडण झाले. त्यावेळी बोहोने महिलेच्या पोटावर लाथ मारली. त्यानंतर या महिलेचा गर्भपात झाला. आरोपीला संबंधित महिला ही चार महिन्याची गर्भवती असल्याचे माहीत होते, तरीही त्याने पोटावर लाथ मारली आहे.