पुणे – सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार एनआयबीएम रस्ता कोंढवा परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी 37 वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत 17 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांत या व्यक्तीविरुद्ध, विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी टिंबर मार्केट येथे कामाला असून, मार्केटयार्ड परिसरात वास्तव्यास आहे. तो अधून–मधून घरी येतो. बुधवारी (दि.16) तो पीडितेच्या घरी गेला. ती घरामध्ये झोपली असताना, त्याने तिचा विनयभंग केला.
यावेळी तिला जाग आली असता, त्याने तोंड दाबून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने प्रसंगावधान राखत त्याला लाथ मारून बाजूला केले, तेव्हा तो पळून गेला. या प्रकारामुळे ती खूप घाबरली होती.
या प्रकाराची हकिकत तिने आईला दोन दिवसानंतर सांगितली. त्यानंतर पोलिसांत धाव घेत तिने फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गिरी करत आहेत.