लक्ष्मी रस्त्यावरील शूज शोरुम मालकाची अपहरण करुन हत्या
पुणे,दि.5- पुण्यातील प्रसिद्ध शूज शोरुम मालकाची दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरणकरून सातारा जिल्ह्यात नेऊन हत्या करण्यात आली. तीक्ष्ण हत्याराने वार तसेच डोक्यात गोळी झाडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात मिसींगची केस दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.
चंदन कृपादास शेवानी (वय 48, रा. बंडगार्डन) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सातारा जिल्हा पोलीस दलातील लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवानी यांचा चप्पल विक्रीचा व्यावसाय आहे. शेवानी हे साधूवासवानी चौकातील परमार पॅराडाईझ येथे कुटूंबियासोबत राहत होते. दरम्यान, शनिवारी रात्री साडे दहा वाजता त्यांना कुटूंबियांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, फोन लागत नसल्याने त्यांच्या कुटूंबियांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार घेतली. तसेच, त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मोबाईलवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला. तो होऊ शकला नाही.
दरम्यान, रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ता. खंडाळा गावच्या कॅनॉलजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी डोक्यात गोळी झाडल्याचे दिसून आले. तर, अंगावर तीक्ष्ण हत्याराच्या खूना असल्याचे समोर आल्यानंतर खून झाल्याचे समजले. त्यानंतर सातारा पोलिसांनी पुणे शहर, ग्रामीण तसेच मुंबई आणि लोणावळा पोलिसांना संपर्ककरून अनोळखी मृतदेह सापडला असून, मिसींगबाबत चौकशी केली. त्यानंतर दुपारी व्यापारी चंदन शेवानी यांचा मृतदेह असल्याचे समजले.
पाडेगाव येथे एका व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची माहिती सकाळी प्राप्त झाली होती. त्यानूसार घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. यानंतर इतरत्र कोठे मिसींग दाखल आहे का याची चाचपणी केली. तेव्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री उशीरा मिसींगची केस दाखल असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी एक पिस्तूलीची पुंगळीही आढळून आली आहे. अपहरण करुन खून करण्यात आल्याची शक्यता आहे. –: तेजस्वी सातपुते(पोलीस अधिक्षक, सातारा)