पिंपरी – भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड, तर सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांना भाजपने भोसरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार लांडगे यांच्या उमेदवारीमुऴे भोसरीतील भाजपच्या निष्ठावंतांना धक्का बसला आहे. भाजपचे पत्ते ओपन झाल्याने आता विरोधकांच्या उमेदवारांकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
चिंचवडमधून आमदार जगताप यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. भाजपच्या निष्ठावंतांनीही उमेदवारीची मागणी केली होती. मागील काळात कार्यक्रम घेत शक्तीप्रदर्शनही केले होते. पिंपरी-चिंचवडमध्येही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची चर्चा होती. मात्र, जगताप यांनाच भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातून आमदार महेश लांडगे हे मागील वेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी आमंत्रण असूनही भाजपचा प्रवेश टाळत इतर पक्षांचे द्वार मोकळे ठेवण्यासाठी सहयोगी सदस्यपद स्विकारले. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत जगताप व लांडगे या जोडगोळीने भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले. आता विधानसभेसाठी लांडगे इच्छूक होते. मात्र, भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी गळ लावल्याने लांडगे यांनी भाजप उमेदवारीबाबत जाहीर बोलणे टाळले. अपक्ष म्हणून लढण्याची तयारी त्यांनी केली होती. मात्र, काल त्यांनी भाजपच्या नावाने उमेदवारी अर्ज नेला. त्यानंतर आज उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपकडून लढण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.