शिक्रापूर- तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील एका खासगी दुकानातून परवाना नसताना रेशनिंगचे तांदूळ विक्री केली जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून शिरूर तहसीलदार कार्यालयातील पथकाने दुकानामध्ये छापा टाकला. यावेळी 34 तांदळाच्या गोण्यांसह एक खोली सीलबंद करण्यात आली. याप्रकरणक्ष दुकानदार महिलेवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. विश्वास डाळिंबकर (वय 47, रा. शिक्रापूर, करंजेनगर 2 ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. रुपाली धनंजय बामणे (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
तळेगाव ढमढेरे येथील एका खासगी किराणामालाच्या दुकानातून रेशनिंगचे धान्य विक्री होत असल्याची माहिती शिरूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे विश्वास डाळिंबकर, मंडलाधिकारी उद्धव फुंदे, तलाठी ज्ञानदेव वाळके, कोतवाल भरत मोडक यांनी दोन पंचांश या दुकानामध्ये जाऊन दुकानाची तपासणी केली. त्यावेळी त्या ठिकाणच्या दुकानामध्ये सरकारी रेशनच्या तांदळाच्या 34 गोणी असल्याचे आढळून आले, त्यावेळी पथकाने दुकानातील महिला रुपाली बामणे यांना या रेशनच्या तांदळाबाबत विचारले. त्यावेळी या महिलेने काहीही माहिती सांगितली नाही. त्यानंतर तहसील विभागातील पथकाने दुकानात आढळून आलेल्या रेशनच्या तांदळाच्या 34 गोणी दुकानातील एका खोलीत ठेवून पंचनामा करून खोली सील केली. त्यानंतर कारवाईचा अहवाल शिरूर तहसील कार्यालयात सादर केला. शिरूरचे तहसीलदार यांच्या आदेशानुसार शिरूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे विश्वास डाळिंबकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर व अविनाश पठारे हे करीत आहेत.