नगर -नवे कारभारी निवडीच्या मुद्यावरुन सदिच्छ मंडळात पेटलेले राजकारण थांबविण्याच्या मुद्यावर नेत्यांचे काल एकमत (?) झाले. सदिच्छा मंडळाचे सर्वेसर्वा तथा राज्य संपर्कप्रमुख विष्णूदादा खांदवे यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी काही कथित पुढाऱ्यांनी सपशेल लोटांगण घातले. त्यातून राग शांत झाल्याने अखेरीस विष्णूदादा खांदवे यांच्याच मोबाईल नंबरहून वाद मिटल्याचे मेसेज शिक्षकांच्या सोशल मीडियात फिरले.
दरम्यान, नवीन कार्यकारीणी निवडीच्या मुद्यावर नाराज होऊन राजीनामे दिलेल्या नेत्यांचे मात्र त्यातून समाधान झालेले नाही. “कोअर बॅंकीग’ व “स्ट्रॉंगरुम’च्या कथित घोटाळेबाजांना पदावरुन हटवावेच लागेल. अन्यथा त्या दोन्ही मुद्यांना सदिच्छा मंडळाचेच पाठबळ होते, अशी धारणा शिक्षकांत रुजू होईल. त्यातून पुन्हा वाईट मेसेजही जाईल आणि सदिच्छा मंडळाची बदनामी थांबविता येणार नाही, असेच परखड मत राजीनामास्त्र बाहेर काढलेल्या शिक्षक नेत्यांनी व्यक्त केले आहे.
त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांची फेरनिवड होत नाही, तोवर हा वाद कायम राहील, अशीच स्पष्ट भूमिका त्यातील काही नेत्यांनी पुन्हा ज्येष्ठ नेते विष्णूदादा खांदवे यांच्या पुढ्यात मांडली आहे. नुकतीच निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना हटविल्यास ते बंडाचे निशाण फडकवतील, अशीही शक्यता आहे. न हटविल्यास राजीनामास्त्र बाहेर काढलेल्या नेत्यांची काय भूमिका असेल?, असे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
त्यातून नवे पेच निर्माण झाले आहेत. त्यात कसा मार्ग निघतो, हे पाहणेच आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत सदिच्छा मंडळाचा दारुण पराभव झाला. “कोअर बॅंकीग’ व “स्ट्रॉंगरुम’च्या कथित घोटाळ्याचे आरोप त्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. परिणामी आरोपांत अडकलेल्यांना बाजुला ठेवूनच सदिच्छाची नवी मांडणी करावी, असा काही नेत्यांचा आग्रह होता.
तथापि, तो आग्रह दुर्लक्षित करुन ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले. त्यानांच घोटाळ्याचे बक्षीस म्हणून नवे कारभारी केल्याचा आरोप “सदिच्छा’मधील राजीनामास्त्र बाहेर काढलेल्या शिक्षक नेत्यांनी केलेला आहे. तसेच कथित घोटाळ्यात आता नेत्यांचाही हात होता काय? अशी शंकाही शिक्षक उपस्थित करत आहेत.
“दादां’चा मोबाईल कुणी केला हॅंडल..!
सदिच्छा मंडळाचे सर्वेसर्वा व राज्य संपर्कप्रमुख विष्णूदादा खांदवे यांना वयोमानाप्रमाणे ऍन्डॉईड मोबाईल वापरता येत नाही. मग त्यांच्या मोबाईलवर मेसेज टाईप करुन तो फॉरवर्ड कुणी केला? असा सवाल शिक्षक संघटनेतील काही जाणकारांनी उपस्थित केला आहे. स्वत:ची आब्रु वाचविण्यासाठी त्याच कथित पुढाऱ्यांनी ही खेळी केल्याचा दावाही करण्यात येत आहे.
विष्णूदादा खांदवे यांच्या नावाने व्हायरल झालेला व्हॉटस् ऍप मेसेज संघ शक्ती युगे युगे.. जय सदिच्छा..
जाहीर आवाहन, अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळातील कार्यकर्त्यांना सूचित करण्यात येते की जिल्हा संघ, सदिच्छा मंडळ, उच्चाधिकार समिती, महिला आघाडी, पदवीधर संघ, नगरपालिका संघाच्या निवडी झालेल्या आहेत. त्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये समज/गैरसमज होऊन राजीनामा सत्र सुरु झाले होते. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन जिल्हा स्तरावर लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. सदिच्छा मंडळ व संघाच्या वाढीसाठी जिल्ह्यातील कुणीही चुकीच्या पोस्ट वा बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करु नयेत. सदिच्छा मंडळ एकसंघ आहे आणि एकसंघच राहील.
आपलाच, खांदवेदादा,
राज्य संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य.
सदिच्छा मंडळाच्या नवीन कार्यकारीणी निवडीवर निर्माण झालेल्या वादग्रस्त मुद्यांवर कथित पुढाऱ्यांनी ज्येष्ठ नेते विष्णूदादा खांदवे यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांना राज्य संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंतीही केली. प्रमुख नेत्यांची लवकरच जिल्हास्तरावर बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली. मात्र, आम्ही उपस्थित केलेल्या मुद्यांवर त्या बैठकीत निर्णय न झाल्यास आमची वेगळी भूमिका कायम असेल, यात दुमत नाही.
गोकुळ कळमकर
राज्य प्रतिनिधी, सदिच्छा मंडळ, नगर.