मुंबई : मृत्यूचा सापळा अशी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची ओळख कायम राहिली आहे. मागील वर्षी (2019) त्या एक्स्प्रेस वेवर सरासरी दररोज 1 याप्रमाणे तब्बल 352 अपघात झाले. त्या अपघातांमध्ये 91 जणांना जीव गमवावा लागला.
महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी जारी केलेल्या आकडीवारीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातांबाबतची माहिती समोर आली. त्या एक्स्प्रेस वेवर 2018 या वर्षी 359 अपघात झाले. त्या अपघातांमध्ये 114 जण मृत्युमुखी पडले, तर 174 जण गंभीर जखमी झाले.
वाहनांचा भरधाव वेग हे त्या अपघातांमागील प्रमुख कारण मानले जात आहे. गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात 32 हजार 876 रस्ते अपघात झाले. त्यामध्ये 12 हजार 565 जण मृत्युमुखी पडले. त्याशिवाय, 19 हजारहून अधिक गंभीर जखमी झाले.
केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी देशात सर्वांधिक अपघात तामीळनाडूत घडले. अपघातांच्या संख्येचा विचार करता महाराष्ट्र पाचव्या स्थानावर राहिला. उत्तरप्रदेशात सर्वांधिक मृत्यूंची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागला.