सर्वोच्च न्यायालयाने मागवला केंद्राचा प्रतिसाद
नवी दिल्ली – पुरूषांप्रमाणेच मुस्लिम महिलांनाही मशिदींमध्ये जाऊन प्रार्थना करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी करणारी एक याचिका पुण्यातील एका दाम्पत्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्या एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने घेतला आहे. त्या अनुषंगाने न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस जारी करून या प्रकरणात त्यांना त्यांची भूमिका मांडण्यास सांगितले आहे.
केरळात सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने या आधी दिला आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही ही याचिकाही विचारार्थ घेऊ असे न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीच्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सांगितले. या एकाच कारणासाठी आम्ही तुमची ही याचिका विचारार्थ घेऊ शकतो असेही न्यायालयाने नमूद केले आहे.