महापालिका, भूमीग्रीनचा संयुक्त उपक्रम
पुणे : महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवा अंतर्गत यंदाच्या वर्षीपासून मुर्तीदान ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पने अंतर्गत विसर्जन घाटांवर आलेल्या भाविकांना विनंती करून मुर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ज्या भाविकांनी मुर्तीदान केली त्यांना मोफत दोन किलो खत वाटप करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत महापालिकेने सुमारे 2 हजार 440 किलो खताचे वाटप करत तब्बल 1100 हून अधिक मुर्ती संकलन केल्या. भूमीग्रीन या संस्थेच्या पुढाकाराने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. तर या उपक्रमास मिळालेली पसंती लक्षात घेऊन पुढील वर्षी तो अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या उपक्रमा अंतर्गत महापालिकेकडून वृधेश्वर घाट, शिवाजीनगर, पटवर्धन समाधी घाट, कात्रज रॅम्प व येरवडा लुंबीनी उद्यान अशा सहा ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. वृध्देश्वर घाट व पटवर्धन घाट येथे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, भूमीग्रीनचे संचालक पंकज पासलकर, विजय टिळेकर यांच्या हस्ते भाविकांना खत वाटप करण्यात आले. यावेळी ठाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे माजी उपायुक्त अनिल पवार यांनीही महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद आपली गणेशमुर्ती दान केली. तर येरवडा येथे लुंबिनी उद्यानात उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी मुर्ती स्वीकारल्या व नागरिकांना खत दिले.
अनेकांचा हिरमोड़
महापालिकेकडून या उपक्रमाची मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे अनेक नागरिकांकडून प्रत्येक विसर्जनघाटावर मुर्तीदानानंतर खता बाबत विचारणा केली जात होती. मात्र, हा उपक्रम केवळ सहाच ठिकाणी असल्याने नागरिकांना क्षेत्रीय कार्यालय अथवा आरोग्य कोठीच्या ठिकाणी जाऊन खत घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे अनेक भाविकांचा हिरमोड झाला. तसेच हा उपक्रम सर्वच घाटांवर का नाही अशा भावना व्यक्त करत नाराजीही व्यक्त करण्यात आली.