14 आरोपींना पकडून 60 मोबाइल पोलिसांनी केले हस्तगत
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 14 – गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्तांचे मोबाइल, सोनसाखळी आण पाकिटांवर डल्ला मारण्यासाठी परराज्यांतीत टोळ्या दाखल झाल्या होत्या. यातील हरियाणातील महिलांच्या एका टोळीला फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसेच वर्धा आणि मुंबई येथील मोबाइल चोरांच्या चार टोळ्याही जेरबंद केल्या आहेत. गुन्हे शाखेने शुक्रवारीच मालेगाव येथील 19 जणांच्या टोळीला जेरबंद करून 82 मोबाइल हस्तगत केले होते. तर फरासखाना पोलिसांनी 14 आरोपींना पकडून 7 लाख 62 हजारांचे 60 मोबाइल हस्तगत केले आहेत.
फरासखाना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून बेलबाग चौकात संशयितरीत्या फिरणाऱ्या सहा महिलांच्या एका टोळीला ताब्यात घेतले. त्या मुळच्या हरियाणा येथील असून दिल्लीतून ट्रेनने विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात दाखल झाल्या होत्या. त्या सोनसाखळी चोरण्यासाठी आल्या होत्या. या सर्वजणी बहीण, भावजय अशा नात्यातीलच आहेत. दरम्यान, फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 59 हजारांच्या सोनसाखळी चोरीची त्यांनी कबुली दिली आहे.
विसर्जना दरम्यान फरासखाना पोलीस ठाण्यात मोबाइल, पाकिट आणी सोनसाखळी चोरीच्या 41 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच एक महिला हरवल्याचीही तक्रार दाखल आहे.
चौकट
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, पोलीस उपनिरीक्षक यशपाल सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी बापु खुटवड, सयाजी चव्हाण, केदार आढाव, अमर शिंदे, विशाल चौगुले, दिनेश भांदुर्गे, सचीन कुटे, सचिन सरपाले, मोहन दळवी, आकाश वाल्मीकी, अमेय रसाळ, मयुर भोकरे, पंकज देशमुख, राजू देवकर, अनिल गायकवाड यांच्या पथकाने केली.
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोबाइल, पाकिट आणि सोनसाखळी अशा किंमती ऐवजाची गर्दीचा फायदा घेत चोरी करण्यात येते. यासाठी खास आंध्र, कर्नाटक, हरियाणासारख्या राज्यांतून चोरट्यांच्या टोळ्या शहरात दाखल होतात. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतूनही चोरांच्या टोळ्या दाखल होतात. ही बाब लक्षात घेऊन फरासखाना पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच पोलिसांची पथके तयार करून गुन्हेगारांवर लक्ष ठेवले होते. त्यामुळे या टोळ्यांना जेरबंद करण्यात यश मिळाले.
जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक