बारावीच्या परिक्षेत दोन तोतया विद्यार्थ्यांसह चौघे अटक
पुणे,दि.20- बारावीच्या परिक्षेत इंग्रजीच्या पेपरला दोन तोतया विद्यार्थी बसल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. ही घटना बीएमसीसी महाविद्यालयात उघडकीस आली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन तोतया विद्यार्थ्यांसह चौघांना अटक केली आहे.
दत्तात्रय दिलीप भालेराव(20,रा.नानेकरवाडी, चाकण), प्रसाद अशोक शिंदे(20,रा.नानेकरवाडी , चाकण), अनिकेत अण्णासाहेब नानेकर(20, रा.नानेकरवाडी, चाकण), शुभम लहू कदम(20,रा.भोसरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी बीएमसीसी महाविद्यालयाच्या महिला प्राचार्यांनी फिर्याद दिली आहे. बीएमसीसी महाविद्यालयात एच.एच.सी. बोर्डाकडून परिक्षा घेण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी इंग्रजीचा पुरवणी पेपर सुरु होता. ब्लॉक क्रमांक 13 मधील विद्यार्थी दत्तात्रय भालेराव तर ब्लाक नंबर 16 मधील विद्यार्थी अनिकेत नानेकर यांनी तोतया विद्यार्थी अशोक शिंदे व शुभम कदम यांना त्यांच्या जागेवर पेपर लिहण्यास बसवले होते. तोतयागिरी करुन परिक्षेस बसवल्याप्रकरणी चौघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए.आर.महाजन तपास करत आहेत.
डमी विद्यार्थ्यांचे बारावीचे शिक्षण पुर्ण झाले आहे. यातील एक विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेतो तर दुसरा नोकरी करतो. डमी विद्यार्थी आणी परिक्षार्थी चौघेही एकमेकांचे मित्र आहेत. हॉल तिकीट तपासणीत त्यांचा फोटो मॅच न झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.