रसिकांची अलोट गर्दी : जॉर्ज ब्रुक्स यांच्या अप्रतिम सॅक्सोफोन वादनाने आणली रंगत
पिंपरी – स्वरसागर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांनी आपल्या बहारदार गायनाने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. त्यांच्या स्वरांनी अवघे वातावरण भारून गेले होते.
प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानात महेश यांचे गायन ऐकण्यासाठी रसिकांनी साडेसहापासूनच गर्दी केली होती. महेश यांनी राग पूरिया कल्याणमधील “बहुत दिन बीते, अजहून आये मोरे शाम’ ही विलंबित बंदिश सादर केली. “मन लोभले, मन मोहले’, ही जितेंद्र अभिषेकी यांची अजरामर रचना नव्या स्वरूपात सादर करून नव्या-जुन्याचा संगम घडविला. जॉर्ज ब्रुक्स यांच्या सॅक्सोफोनच्या साथीने सादर झालेल्या या रचनेच्या नवीन रूपाला रसिकांनी पसंतीची पावती दिली. त्यानंतर महेश यांनी चिरपरिचित अशी सुरावट सादर करून रसिकांना गीत ओळखण्यास भाग पाडले. “घेई छंद मकरंद…’ या गीताला रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळाली. संथ, शांत लयीच्या गाण्याची एक अत्यंत जोरकस थाटाची रचना पण मूळ नाटकातच आहे. त्याच रचनेला पाश्चात्त्य सुरावटीने खुलवून महेश यांनी जॉर्ज ब्रुक्स यांना सॅक्सोफोनवादन करण्यास भाग पाडले.
मूळ भारतीय गीताचे हे पाश्चात्त्य रूप रसिकांच्या मनावर गारुड करून गेले. अर्थातच या रचनेला चार चांद लावले ते जॉर्ज ब्रुक्स यांच्या अप्रतिम सॅक्सोफोन वादनाने. त्यातच ड्रमची साथ करणाऱ्या आशिष आरोसकर आणि की-बोर्डची साथ करणाऱ्या अमित गोठिवरेकर यांच्या वादनाने एक वेगळात माहौल तयार केला. प्रभाकर मोसमकर यांचा जेंबे आणि सूर्यकांत सुर्वे यांची तालवाद्ये या सगळ्यांच्या साथीला होती.
देश रागातील “ऐरी आवो जी आवो मंगल गावो’ ही रचना सादर करता करता “भारत हमको जानसे प्यारा है’ या देशभक्तीने भारलेल्या गीताकडे रसिकांना वळविले. खास प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या रचना सादर करून रसिकांच्या मनात देशभक्तीची साद घातली. त्यानंतर “कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील गीत सादर करून रसिकांना “स्वरांच्या हिंदोळ्यावर’ झुलविले. या गीताच्या दरम्यान खास महेश यांच्या आग्रहावरून उपस्थितांमधून हजारो मोबाईलच्या टॉर्चने वातावरण अक्षरश: चैतन्यमय झाले. त्यानंतर “आम्हा नकळे ज्ञान..’ या गीताच्या सुरांमध्ये उपस्थितांना देखील ओढून घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वरमंचावर आपले वादन संपवून बसलेले जॉर्ज ब्रुक्सदेखील पुन्हा सहभागी झाले. स्वरांनी भारलेल्या मैफिलीची सांगता वंदे मातरमने झाली.
महेश यांना या मैफिलीसाठी “सूर नवा ध्यास नवा’ या सांगितिक कार्यक्रमातील वादकांनी अत्यंत सुंदर आणि समर्पक साथ केली. अनिल फरांदे, प्रवीण पोळ, सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. राजीव तांबे (संवादिनी), प्रसाद पाध्ये (तबला), प्रभाकर मोसमकर (ढोलकी), आशिष आरोसकर (ड्रम), सूर्यकांत सुर्वे (तालवाद्य), अमित गोठिवरेकर (कीबोर्ड), मनीष कुलकर्णी (गिटार) आणि वरद कठापूरकर (बासरी) यांनी साथसंगत केली. शरयूनगर मित्रमंडळाचे (प्राधिकरण) संयोजन सहकार्य लाभले. अस्मिता सावंत, गजानन चिंचवडे, पुरूषोत्तम डबीर, मोहन लोंढे, तानाजी ठिगळे, नितीन ढमाले यांनी बहुमोल सहकार्य केले.