- देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी इंद्रायणी थडीचे उद्घाटन
- राम मंदिराची प्रतिकृती व रामायणाचा लेझर शो ठरणार मुख्य आकर्षण
भोसरी – महिला सक्षमीकरण चळवळीतील सार्वजनिक उपक्रमात नावाजलेल्या इंद्रायणी थडी जत्रेत भरगच्च सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांबरोबरच प्रबोधन आणि जनजागृतीपर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ निर्माण करणारी ही जत्रा हक्काचे व्यासपीठ ठरेल, असे संयोजिका व शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यत चालणाऱ्या इंद्रायणी थडीचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता होणार आहे.
भोसरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, कामगार नेते सचिन लांडगे आदींसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर आमदार लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भरविलेल्या इंद्रायणी थडीचे हे दुसरे वर्ष आहे. दि. 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असे चार दिवस, सकाळी 10 ते सायंकाळी 10 या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे. “महिला सुरक्षा आणि सन्मान’ ही जत्रेची थीम आहे. यासह मनोरंजन, खेळ, ऐतिहासिक पौराणिक देखावे, खाद्यपदार्थ, महिला बचतगटांची उत्पादने, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा याची प्रचिती देणारी इंद्रायणी थडी यावर्षी दुसरे पर्व साजरे करीत आहे, अशी माहिती शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पूजा महेश लांडगे यांनी दिली.
जत्रेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. दिवस पहिला (गुरुवार, 30 जानेवारी) : उद्घाटन समारंभ, चला हवा येऊ द्या, नृत्य कार्यक्रम, संगीत कार्यक्रम : ज्ञानेश्वर मेश्राम, भजन स्पर्धा, पारंपरिक नृत्य स्पर्धेची निवड चाचणी असे कार्यक्रम होतील. दुसरा दिवस : (शुक्रवार, 31 जानेवारी): भजन स्पर्धा, नव्याने जत्रा भरते : सुधीर काळजे, पारंपरिक नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी. तिसरा दिवस : (1 फेब्रुवारी) : अभंग बॅंड, पारंपरिक फॅशन शो, कीर्तन : निवृत्ती महाराज देशमुख, पाश्चात्य नृत्य स्पर्धा निवड चाचणी आणि अंतिम फेरी, स्वसंरक्षण कार्यक्रम. चौथा दिवस : (2 फेब्रुवारी) : पारंपरिक फॅशन शो, भजन स्पर्धा, “मिस इंद्रायणी’ फॅशन शो, डान्स स्पर्धा, मर्दानी खेळ, आदिवासी नृत्य, जत्रेचा समारोप कार्यक्रम.
जत्रेतील मुख्य आकर्षक
मॅजिक शो, वन मिनिट शो. मंगळागौर उखाणे कार्यक्रम, मॅजिक शो-धनगर, झुंबा डान्स, कोळी डान्स, लावणी कार्यक्रम, मर्दानी खेळ, आदिवासी नृत्य, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, गड-किल्ले छायाचित्र प्रदर्शन, बालजत्रा आदी कार्यक्रमांचेही नियोजन केले आहे.
“इंद्रायणी थडी’त काय पहाल
राममंदिर प्रतिकृती, महात्मा फुले वाडा, ग्रामसंस्कृती, बालजत्रा, खाद्यपदार्थ महोत्सव, लेझर शो.