Modi government : भारतामधील विरोधी पक्ष परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मंगळवारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत काॅंगेस नेते म्हणाले की, मोदी सरकार एका वर्षाच्या आत कोसळेल. पण ते शक्य नाही. या विरोधी पक्षाला देशात अराजक माजवायचे आहे, हे स्पष्ट होते आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दावा केला की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने भाजपाच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेतृत्त्वाला गद्दार असल्याचे म्हणत आहेत. देशभर दंगे भडकवून आणि अराजकतेच्या माध्यमातून मोदी सरकारला सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. या विधानांवरून असे सूचित होते की, काही लोक भारताची लोकशाही कमकुवत करण्याच्या उद्देशाने, जॉर्ज सोरोस आणि त्यांच्या परदेश प्रवासाला निधी पुरवणाऱ्या परदेशी कंपन्यांसारख्या आपल्या मालकांच्या प्रभावाखाली राहून परकीय अजेंडा राबवत आहेत. पण देशातील जनता सुज्ञ आहे. भारतातील लोकांमध्ये एक आध्यात्मिक जाणीव आहे. तुम्ही भारतातील लोकांना चिथावून दंगे भडकवू शकाल का? नाही. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये काय घडले, हे तुम्ही पाहिलेच आहे. जोपर्यंत या सरकारला जनतेचा आशीर्वाद लाभलेला आहे, तोपर्यंत हे सरकार देशाची सेवा करत राहील, असे पात्रा म्हणाले.