– एकाच कामाच्या तीन तुकड्यांमध्ये निविदा
पुणे : प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी केलेल्या नियमांचा सोयिस्कर वापर करत, प्रभागातील विकासकामांच्या निविदा ठराविक ठेकेदरांना मिळवून देण्याचा घाट घातला जात असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून हा प्रताप करण्यात आला आहे. या क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या प्रभाग 30 मधील शाळेच्या विद्युत विषयक कामासाठी प्रत्येकी 8 लाख 92 हजारांच्या दोन निविदा काढण्यात आल्या असून प्रभागातील विद्युत कामाच्या नावाखाली 7 लाख 79 हजारांची निविदा काढण्यात आली आहे. या निविदेचा खर्च 25 लाखां पर्यंत अतिरिक्त आयुक्तांची तर त्या पेक्षा अधिक खर्च झाल्यास स्थायी समितीची मान्यता घ्यावी लागली असती त्यामुळे एकाच कामाचे तीन तुकडे करून ही निविदा काढण्याचा घाट घालण्यात आला आहे.
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रभाग 30 मधील शाळा तसेच शाळेचे वायरिंग करण्यासाठी 8 लाख 92 हजार 747 रूपयांची निविदा, त्यानंतर शाळांचे विद्युत विषयक काम करणे या नावाखाली 8 लाख 92 हजार 831 रूपयांची आणखी एक निविदा तसेच प्रभात 30 मध्ये विद्युत विषयक कामे करणे यासाठी 7 लाख 89 हजार 175 रूपयांची निविदा काढली आहे. या कामांसाठी 60 दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही तीन्ही कामे विद्युत विषयक असून दोन कामे एकाच शाळेच्या विद्युत दुरूस्तीची आहेत. त्यांची रक्कम सुमारे 17 लाख होते. त्यामुळे हे काम क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारात करणे शक्य नव्हते तसेच ते अतिरिक्त आयुक्तांकडे मान्यतेसाठी गेल्यास त्यावर आक्षेप काढले गेले असते. तर तिन्ही कामे एकाच स्वरूपाची असल्याने त्यांच्या निविदांची रक्कम 25 लाखांच्या वर गेली असती तर ती स्थायी समितीच्या मान्यतेसाठी आणावी लागली असती. त्यामुळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून तीन तुकडयांमध्ये या निविदा काढण्याचा घाट घालण्यात आला आहे.
ही सरळ सरळ पुणेकरांच्या डोळयात धुळफेक करण्याचा प्रकार आहे. अशा प्रकारे कामाचे तुकडे करून निविदा काढणे बेकायदेशीर आहे. मात्र, नियमाच्या चौकटीत बसवून हा घाट घातला जात आहे. त्यामुळे याचा फायदा काही ठराविक घटकांना डोळ्यासमोर ठेऊनच घेतला जात असून हे प्रकार तातडीनं थांबविणे आवश्यक आहे.- संजय शितोळे ( सिटीआय संस्था)