पुणे – शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकले असताना अवैध प्रवासी वाहतूक करून कोंडीत भर घालत आहेत. या खासगी बसना (ट्रॅव्हल्स) महापालिका “जॅमर’ लावून जागेवरच 25 हजार रुपये दंड वसूल करणार आहे. मात्र, तेवढ्या क्षमतेचे जॅमर महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे नसल्याने ही कारवाई रखडली आहे.
अवैध खासगी प्रवासी बसची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. हे वाढते प्रमाण आणि चालकांकडून सर्रास केला जात असलेला नियमभंग यामुळे रस्त्यावरील वाहतुकीत अडथळे येत आहेत. याला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईत राजकीय हस्तक्षेप आणि दमदाटी होण्याच्या शक्यतेने पोलिसांसमक्षच बसगाड्या रोखण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर (हडपसर), पुणे रेल्वेस्थानक, शिवाजीनगर, संगमवाडी, वाकडेवाडी भागांत ही कारवाई होणार असून, त्यासाठी रात्रीच्या वेळी पथके नेमली आहेत. मात्र, या पथकांकडे कारवाईसाठी बसच्या मोठ्या आकाराच्या जॅमर नसल्याने फक्त या बसचालकांना नोटीस देऊन सोडण्यात येत आहे.
100 जॅमर खरेदी करणार
महापालिका बस कारवाईसाठी आवश्यक मोठे 100 जॅमर खरेदी करणार आहे. या जॅमरची निर्मित करण्यात येत असून, लवकरच ते महापालिकेला प्राप्त होतील. मात्र, या दरम्यानदेखील महापालिकेची कारवाई सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.