मंचर- येथील शिवगिरी मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर जागून पुरग्रस्तांसाठी दहा हजार जेवणाचे डबे तयार केले आहेत. तयार जेवणासह पिण्याचे बाटलीबंद पाणी, केळी आणि बिस्कीटचे बॉक्स पाठविण्यात आले आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेवणाचे डबे गाडीमधून शनिवारी (दि. 10) रवाना करण्यात आले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उद्योजक अजय घुले, संचालक दत्ता थोरात, राष्ट्रवादीचे मंचर शहराध्यक्ष ऍड. राहुल पडवळ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण थोरात, गोवर्धन दूध संस्थेचे अरविंद देसाई, अशोक निघोट याच्यांसह पक्षाच्या 50 महिला व 30 पुरुष कार्यकर्त्यानी दहा हजार पुरग्रस्तांसाठी मसाला पुऱ्या, शेंगदाणा चटणी आणि बुंदी तयारी केली.
अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात यांच्या हस्ते पिकअप टेम्पोचे पूजन करुन सदर अन्नपदार्थ भरलेले टेम्पो सांगली व कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले. पुढील काळातही पुरग्रस्तांसाठी अशाच पद्धतीच्या तयार जेवणासह कोरडा शिधा व इतर मदत पाठविणार असल्याची माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.