प्रतिबंधात्मक आदेश धुडकावत राजधानीत आंदोलन सुरूच
नवी दिल्ली : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी पोलिसांनी जामा मस्जीद ते जंतर मंतर असा मोर्चा काढताना अटक केली. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते पसार झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. पोलिसांकडून मात्र याला दुजोरा मिळू शकला नाही.
भीम आर्मीने केलेल्या दाव्यानुसार, जामा मस्जिद येथे जाण्यापासून अडवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र तरीही ते तेथे पोहोचलेच. मात्र पोलिसांनी त्यांना दर्यागंज जवळ अटक केली. मात्र तेथूनही पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाण्यात ते यशस्वी झाले.
भीम आर्मीने सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या (का) विरोधात निषेध मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी ती नाकारली. जामा मशिदीबाहेर शुक्रवारचा नमाज पठण करून झाल्यावर हजारो तरूण जमा झाले. त्यांनी का कायद्याविरोधात घोषणा द्यायला सुरवात केली. त्यावेळी निमलष्करी दलाचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते.
राज्यघटनेची प्रत हाती घेऊन चंद्रशेखर आझाद त्यात आघाडीवर होते. काही निदर्शकांजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम आणि भगतसिंह यांची छायाचित्रे होती. या भागा शिवाय अन्य भागातही मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. सीलामपूर भागातही निदर्शने करण्यात आली. जामा मशिदकडून जंतर मंतर कडे जाणारा मोर्चा पोलिसांनी दिल्ली गेटजवळ अडवला. तेथे बॅरिकेडस् उभारण्यात आली होती. तेथे शिघ्र कृती दल तैनात करण्यात आले होते. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोरेशनने चार स्थानके बंद ठेवली होती. सुरक्षा सलांनी शुक्रवारी सकाळी सीलामपूर भागात ध्वज संचलन केले. 12 पोलिस ठाण्यात ड्रोनद्वारे आंदोलकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.