मुंबई – आजच्या तरुणाईला भारतीय कवितेकडे परत आणायचे असेल, तर समकालीन भारतीय कवींच्या कवितांविषयी त्यांना सांगितले पाहिजे, या हेतूने एक वर्षभर चालवल्या गेलेल्या “पोएम अ डे’ (रोज एक कविता) या कवी गुलजार यांच्या अनोख्या उपक्रमाला ग्रंथरुप प्राप्त झाले आहे. विख्यात प्रकाशक हार्पर कॉलिन्स यांनी प्रकाशित केलेल्या “पोएम अ डे’ या 800 हून अधिक पानांच्या पुस्तकात 34 भारतीय भाषांमधील 279 कवींच्या 365 कविता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या सर्व कवींच्या कविता भारतीय स्वातंत्र्यानंतर लिहिलेल्या आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये कुसुमाग्रजांची “पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा…’ ही “कणा’ नावाची कविताही आहे.
या सर्व कविता मूळ त्या भाषेतल्या लिपीत असून त्या कवितांचे हिंदी आणि इंग्रजी अनुवादही करण्यात आले आहेत. हे सर्व काम गुलजार यांनी लॉकडाऊनच्या काळात केले असून आजवर भारतीय साहित्यांत कवितेविषयी इतकी व्यापक भूमिका असलेला ग्रंथ सिद्ध झालेला नाही. त्यामुळे या पुस्तकाच्या खपाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. यात गुलजार यांच्या कोविड आणि लॉकडाऊनच्याही कविता आहेत.
याशिवाय भारताची शेजारी राष्ट्रे असलेल्या नेपाळ, भूतान, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या काही कवींच्या कविताही सामावलेल्या आहेत. त्यामुळे या ग्रंथाला एक आगळेवेगळे संदर्भमूल्यही प्राप्त झाल्याचे मानले जात आहे.