यंदाच्य ऑस्करसाठी भारताकडून विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला “नटखट’ पाठवला जाणार आहे. ‘नटखट’च्या निर्मात्यांकडून गुरुवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. लैंगिक समानतेच्या विषयावर आधारलेला ‘नटखट’ हा एक माहिती आणि लघुपट आहे. त्यातील विद्याच्या भूमिकेपेक्षाही त्यातील आशयसंपन्न विषयामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे आतापर्यंत खूप कौतुकदेखील झाले आहे. सध्या सोशल मिडीयावर या सिनेमातील एका सीनची क्लीप खूप लोकप्रिय होते आहे.
विद्या आपल्या लहानग्या बाळाच्या डोक्याला तेल लावून मसाज करते आहे आणि त्याच्याशी खूप मस्त गप्पा मारते आहे, असे या सीनमध्ये दिसते आहे. अगदी निरागसपणे सुरू असलेल्या या गप्पांचा ओघ अचानक गंभीर वळण घेतो आणि विद्याचा चेहरा चिंताक्रांत बनतो. का ते या सिनेमात प्रत्यक्ष अनुभवणेच योग्य ठरेल.
‘वुई आर वन: ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या सिनेमाचा प्रिमियर युट्युबवर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर कान, ट्रिबेक, मुंबई आणि अन्य आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही ‘नटखट’ दाखवला गेला होता. ‘नटखट’ची निर्मिती रॉनी स्क्रूवालाने केली आहे. गेल्या वर्षी 2 जूनला हा लघुपट युट्युबवर रिलीज केला गेला होता.