शरद पवार, अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा केला निषेध
पुणे -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या “शिवस्वराज्य’ यात्रेला आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याला जनतेकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळेच सत्ताधारी भाजपकडून ईडीच्या माध्यमातून रडीचा डाव खेळला जात आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंडईतील टिळक पुतळ्याजवळ बुधवारी आंदोलन केले.
पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्त्वाखाली शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर आणि इतर कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर ठिय्या मांडून चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना विरोध करत उचलून गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. या आंदोलनात महिला अध्यक्षा स्वाती पोकळे, माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड, माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, प्रदीप देशमुख, राकेश कामठे आदी सहभागी झाले होते.