विरार : भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीने धाड टाकली. ईडीने विवाशी संबंधित पाच ठिकाणी धाडी टाकल्या. सकाळपासून विरारमध्ये ईडीच्या धाडी सुरु होत्या. मनीलॉन्ड्रिंगच्या संबंधातून या सगळ्या धाडी टाकल्या जात असल्याचे समजते.
भारतभर गाजलेल्या पीएमसी घोटाळ्यात 5 ते 6 हजार कोटींचे मनीलॉन्ड्रिंग झाले होते. यातले काही पैसे विवाशी संबंधित संस्थेमध्ये गुंतवण्यात आले होते. हा सगळा मनी ट्रेल ईडीच्या अधिका-यांनी शोधला होता. याच पार्श्वभूमीवर आता ही कारवाई सुरु झाली आहे.
ईडीने विवाशी संबंधित कार्यालयांवर तसेच विवाच्या मालकाच्या घरावर धाड टाकली. यात काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. आणखीही कारवाई सुरु आहे. कारवाई संपल्यानंतर तपासासंबंधी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्याची शक्यता आहे.