पुणे : देवाचे नामस्मरण करण्याचा सहज सोपा मार्ग म्हणून रूढ झालेली भजन ही प्रथा काळाच्या ओघात एक कला म्हणून प्रचलित झाली आहे. या कलेला पुण्यात एक हक्काचे आणि मानाचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्ताने “भक्तीरंग’ या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी दिली. समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी व औंध यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत सनी निम्हण म्हणाले, “गेल्या दोन वर्षांपासून करोना संकटामुळे अनेकांना वारीला जाण्याचा योग आलेला नाही. त्यातच शहरात मोठ्या प्रमाणात भजनी मंडळे असून त्यांनाही करोना संकटामुळे मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत भजनी मंडळांना आपल्या भजनाचा व्हिडिओ 8308-1235-55 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवता येणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी 4 ऑगस्ट रोजी होणार असून त्याच दिवशी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. तसेच प्रथम क्रमांकासाठी 15 हजार 555 रुपये, द्वितीय 10 हजार 555 तर तृतीय क्रमांकासाठी 7 हजार 555 रूपयांचे बक्षीस असणार आहे. तर प्रोत्साहनपर शिस्तबद्ध मंडळ, उत्कृष्ट तबला, पखवाज वादक तसेच उत्कृष्ट पेटी वादकास बक्षिसे दिली जाणार आहेत.’