बेल्हे- केवळ प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी जुन्नर तालुक्यात अनेक शिक्षकांनी अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून जिल्हा परिषद प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित शिक्षकांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या 1 हजार 40 शिक्षकांपैकी काही शिक्षकांनी अपंगांचे बोगस प्रमाणपत्रे सादर केली आहेत. हे शिक्षक शरीराने कोठेही अपंग नाहीत, असे असताना जुन्नर गटशिक्षणाधिकारी गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जून 2019 आणि जुलै 2019 या महिन्यांमध्ये जिल्ह्यांतर्गत शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. मात्र, आपली बदली होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शिक्षकांनी अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र जिल्हा परिषदेत सादर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात ज्या शिक्षकांनी हे प्रमाणपत्र सादर केले ते शिक्षक मुळात अपंगच नसल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत पुणे जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून जुन्नर तालुक्यात अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
- गटशिक्षणाधिकारी बाहेरगावी
याविषयी अधिक माहिती करीता जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांच्याशी संपर्क साधला असता, ते प्रशासकीय कामासाठी बाहेरगावी असल्याने ते माहितीचा अधिकृत तपशील सांगू शकले नाहीत, त्यामुळे त्यांची प्रशासकीय भूमिका समजू शकली नाही. - अहमदनगरमध्येही असेच घडले होते
दरम्यान प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी अपंग असल्याचे प्रमाणपत्र सादर करून जिल्हा परिषद प्रशासनाची फसवणूक केल्याची अशीच घटना यापूर्वी अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे.अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 212 शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर केले होते; परंतु प्रमाणपत्र सदर केलेले शिक्षक अपंग नसल्याचे कळताच 76 शिक्षकांवर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली असल्याची घटना घडली आहे.