अजित पवार : बारामती सहकारी बॅंकेच्या कामकाजाबाबत व्यक्त केले समाधान
बारामती- देशात वाहन उद्योगक्षेत्रातही मंदी आलेली आहे. त्याचा फटका रोजंदारीला बसत आहे. देशात कामगार कपातीची कुऱ्हाड बसून बेरोजगारी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर रिझर्वे बॅंकेकडून नविन शाखा उघडण्यास नागरी सहकारी बॅंकांना मंजुरी दिली जात नाही. अशा परिस्थितीत नागरी बॅंकांना काम करावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात अनेक उद्योगधंदे अडचणीत येत असल्यामुळे कर्जवाटप करताना बॅंकांनी ती कर्जे सुरक्षित कशी राहतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
बारामती सहकारी बॅंकेची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 11) जिजाऊ सभागृह बारामती येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली, त्यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, संभाजीराव होळकर, प्रशांत काटे, मदन देवकाते, इम्तियाज शिकिलकर, सदशिव सातव, संजय भोसले, शारदा खराडे, संदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले बॅंकेच्या ठेवी व कर्जे याची वाढ समाधानकारक आहे बॅंकेस लेखापरीक्षण वर्ग “अ’ मिळाले आहे. बॅंकेच्या 15 शाखा स्वमालकीच्या जागेत सुरु आहेत. भविष्यातही बॅंकेने दरवर्षी काही शाखांसाठी जागा खरेदी कराव्यात त्यामुळे दीर्घकालीन भाड्याचा खर्च कमी होईल. सभेस बॅंकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, उपाध्यक्ष अविनाश लगड, संचालक रमणिक मोता, सचिन सातव, शिरीष कुलकर्णी, देवेंद्र शिर्के, दिग्विजय तुपे, सुभाष जांभळकर, उद्धव गावडे, सुरेश देवकाते, विजय गालिंदे, कपिल बोरावके, डॉ. वंदना पोतेकर, कल्पना शिंदे, नुपूर शहा, प्रितम पहाडे, सतिश सालपे, कार्यकारी संचालक श्निनीवास बहुळकर यांच्यासह सरव्यवस्थापक रवींद्र बनकर, विनोद रावळ व त्यांचे सहकारी सेवक वर्ग उपस्थित होते. दरम्यान, बारामती सहकारी बॅंकेच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
- सभासदांना 12 टक्के लाभांश
बॅंकेच्या ठेवी 1904.36 कोटी व कर्जवाटप 1223.48 कोटी. 36 शाखा व 1 विस्तारित कक्ष, बॅंकेस 11.12 कोटी रुपयांचा नफा झालेला असून सभासदांना 12 टक्के इतका लाभांश जाहीर केलेला आहे. बॅंकेचे सभासद संख्या 17899 एवढी आहे. - सभासद, ग्राहकांसाठी आरोग्य विमा सुविधा
सध्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात बॅंक आपल्या ग्राहकांना आर.टी.जी.एस., नेफ्ट, ई-टॅक्स, ई-स्टॅम्पिंग, पैनकार्ड काढून देणे, मोबाइल बॅंकिंग, एसएमएस बॅंकिंग, फास्ट ट्रॅक पेमेंट सुविधा, विमा सेवा, वीज बिल भरणा सुविधा आदी सुविधा देत असून आर.टी.जी.एस. करिता स्वतःची संगणकीय प्रणाली उभारली आहे. तसेच बॅंकेने सभासद व ग्राहकांसाठी नविन आरोग्य विमा सुविधा सुरू केली आहे. ही योजना “बारामती बॅंक आरोग्य सुरक्षा पॉलीसी’ नावाने ओळखली जाणार आहे. ही पॉलीसी फॅमिलीच्या स्वरुपात राहणार असून बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे.