विविध कामांसंदर्भात मुख्यमंत्र्यासमवेत उद्या मुंबईत बैठक
बारामती- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय वेगाने सुरू करण्याच्या दिशेने आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः लक्ष घातले आहे. पवार यांनी मंगळवारी (दि. 4) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. दरम्यान, पवारांनी महाविद्यालयातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुरध्वनीद्वारे येथील कामासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती तात्काळ मान्य करीत, शुक्रवारी (दि. 7) सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्थमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, आरोग्यमंत्री तसेच विविध विभागांचे सचिव यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
शरद पवार व मुख्यमंत्री या बैठकीस उपस्थित राहणार असून या बैठकीमुळे बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाच्या कामाला गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे .
दरम्यान मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास नुकतीच परवानगी दिली असल्याने ऑगस्ट महिन्यामध्ये बारामतीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. हे महाविद्यालय सुरू होताना येथे कोणत्याही अडचणी येऊ नयेत, या दृष्टिकोनातून शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही प्रयत्नशील आहेत. मंगळवारी स्वतः शरद पवार यांनी या वैद्यकीय महाविद्यालयात येऊन या महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर संजय कुमार तांबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई , उपअभियंता विश्वास ओहोळ यांच्यासह विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी डॉ. तांबे व मिलिंद बारभाई यांनी शरद पवार यांना या संपूर्ण प्रकल्पाविषयी, तसेच झालेल्या प्रगती विषयी सविस्तर माहिती दिली. दरम्यान शरद पवार यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी तातडीने शुक्रवारी बैठक लावून बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व प्रश्न एकाच वेळी सोडविण्याची ग्वाही शरद पवार यांना दिली.