- महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण
- नऊ हजार फेरीवाल्यांसाठी धोरण निश्चित
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाल्यांना राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन निश्चित करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागात, रस्त्यावर, पदपथांवर हातगाडी लावणाऱ्या फेरीवाल्यांना आता चाप बसणार आहे. यामध्ये सर्व फेरीवाल्यांना बायोमेट्रिक पद्धतीने झोन निश्चित करून दिले जाणार आहेत. तसेच त्यांना बारकोड असलेले ओळखपत्र देण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. शहरातील ही समस्या सुटावी यासाठी फेरीवाल्यांचे क्षेत्रीय कार्यालयांअतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये प्रभागनुसार पात्र फेरीवाल्यांनी बायोमेट्रिक सर्वे पूर्ण करायचा आहे. शहरामध्ये 9 हजार 25 फेरीवाल्यांची नोंद आहे. त्यापैकी 5 हजार 923 फेरीवाल्यांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. हे बायोमेट्रिक कार्ड आधार कार्डशी लिंक असेल. यामध्ये अर्जात फेरीवाल्याने ज्या व्यवसायाचा उल्लेख केला आहे, तसेच तो ज्या भागात बसणार आहे त्याचा उल्लेख केला जाणार आहे.
…तर जप्त होणार कार्ड
बायोमेट्रिक कार्डची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या परवाना निरीक्षकांना मशीनही उपलब्ध करून दिले जाणार आहे. या मशिनच्या माध्यमातून ते प्रत्येक फेरीवाल्याचे कार्ड तपासणार आहेत. यामध्ये जर त्यामध्ये व्यवसाय वेगळी व्यक्ती करत असेल आणि बायोमेट्रिक कार्ड दुसऱ्याच्या नावावर आहे, असे आढळल्यास तेथील फेरीवाल्यांच्या साक्षीने पंचनामा करून त्याचे कार्ड जप्त केले जाणार आहे. ज्याच्या नावावर हे कार्ड असेल त्याला त्याची आई, बहीण, भाऊ अशाप्रकारे कुटुंबातील कुणालाही या कार्डवर व्यवसाय करता येईल. मात्र याव्यतिरिक्त कोणी आढळल्यास त्याचे कार्ड रद्द केले जाईल. तसेच हे कार्ड ज्या जागेसाठी दिले जाईल त्याच जागेवर व्यवसाय करण्याचे बंधन असणार आहे.
सद्यस्थितीत अर्जांची छाननी करून तसेच संगणकीय माहिती संकलित करून निकषांच्या आधारावर पात्र फेरीवाल्यांची नोंदणी सुरू आहे. या फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे.