अकोले -वादळी वाऱ्याने तालुक्यातील खिरविरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांची पडझड झाली. या दोन शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी पायफने पुढाकार घेतल्याची माहिती बायफचे विभागीय अधिकारी डॉ. जितीन साठे यांनी दिली.
अलीकडच्या झालेल्या वादळी पावसामध्ये खिरविरे विभागातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील चंदगीरवाडी व इदेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. शैक्षणिक साहित्य व बाकांचे मोठे नुकसान झाले आहे. शाळेच्या छतावरील कौलांचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्याच्या करोनाच्या संकटामध्ये या शाळांकडे गांभीर्याने बघण्यास कुणीही तयार नाही. शाळांचे मोठे नुकसान झाल्याने व शालेय इमारती अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. बहुतेक इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत. या परिस्थितीत शासनाने जरी शाळा सुरू केल्या, तरी येथे मुलांना बसवणे शक्य नाही. त्यामुळे या इमारतींची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
या इमारतींची पाहणी केली असता, बायफचे वरिष्ठ अभियंता रामनाथ नवले व विभागीय अधिकारी डॉ. जितीन साठे यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक रामदास आवारी, बाळासाहेब डेरे, बायफचे क्षेत्र अधिकारी योगेश नवले व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बायफच्या माध्यमाने या दोन शाळांच्या इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्यात येत असल्याची माहिती रामनाथ नवले यांनी दिली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमाने काही मदत निधी उपलब्ध झाल्यास बायफच्या माध्यमाने व अर्थसाह्याने या इमारतीचे दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्याचे नियोजन करता येईल, असे डॉ. साठे यांनी सांगितले.