पाऊस उघडल्याने मिळाला दिलासा
लाखणगाव- कांद्याचे बाजारभाव वाढल्याने बराकीत साठवलेला कांदा भरण्यासाठी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव, देवगाव, काठापूर परिसरातील शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. कांद्याचे बाजारभाव प्रतवारीनुसार दहा किलोसाठी 165 रुपये ते 175 रुपये झाले असल्याने शेतकरीवर्ग कांदा भरण्याच्या कामात व्यस्त झाला आहे.
लाखणगाव, पोंदेवाडी, जारकरवाडी, नागापूर, शिंगवे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. मागील पंधरा दिवसांपासून पावसाची जोरदार रिपरिप सुरू असल्याने आणि सूर्यप्रकाश पडत नसल्याने कांद्याची सड होऊ लागली आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने बराकीत साठवलेला कांदा भरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांना कांद्यापासून चांगले उत्पन्न मिळत आहे.सर्वत्र शेतीची कामे सुरू असल्याने कांदा भरण्यासाठी मजुरांची टंचाई जाणवत आहे.कांद्याचे बाजारभाव वाढल्याने बराकीतील कांदा शेतकरी भरत आहेत. मात्र, इतर पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.