जमीन खरेदी व्यवहारात गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष
………………….
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 8 – जमीन खरेदी व्यवहारात गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याच्या आमिषाने शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याच्या साथीदारांविरोधात येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नितीन अरविंद राशिनकर (रा. बेलविस्टा, सिझन मॉलसमोर, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार रणजीत लोंढे, रोहन लोंढे (दोघे, रा. रोशिमा क्लासिक, कल्याणीनगर, येरवडा), उमेश कोकणे (रा. हिंदुस्थान सोसायटी, कल्याणीनगर, येरवडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक संजय खोमणे (रा. मुंढवा) यांनी यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोमणे बांधकाम व्यावसायिक आहेत. संकेत असोसिएट्स नावाची त्यांची बांधकाम व्यावसायीक कंपनी आहे. आरोपी राशिनकर निशी डेव्हलपर्सचा मालक आहे. राशिनकर याची खोमणे यांच्याशी ओळख झाली होती. शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूकदारांची आवश्यकता असल्याचे राशिनकर याने खोमणे यांना ऑक्टोबर 2017 मध्ये सांगितले होते. शहरातील एका जमिनीचा 20 कोटी रुपयांचा व्यवहार सुरू आहे. या व्यवहारात दीड कोटी रुपये गुंतवल्यास दोन कोटी रुपये नफा मिळवून देऊ असे, आमिष राशिनकरने दाखविले होते. त्यावेळी माझ्याकडे एवढी रक्कम नाही, असे खोमणे यांनी त्याला सांगितले होते. त्यानंतर राशिनकर, त्याचे साथीदार लोंढे आणि कोकणे यांनी खासगी वित्तसंस्थेतून दीड कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देऊ, असे खोमणे यांना सांगितले. सिंहगड रस्ता भागातील खासगी वित्त संस्थेतून वार्षिक 24 टक्के व्याजदराने दीड कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यापैकी काही रक्कम वजा करून खोमणे यांच्या बॅंक खात्यात 1 कोटी 46 लाख 46 हजार रुपये जमा झाले. राशिनकर आणि साथीदारांनी लगेचच काही रक्कम काढण्यास सांगितले. त्यानंतर खोमणे यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेण्यात आले. खोमणे यांनी दीड कोटी रुपये राशिनकरला दिले. गुंतवणूक योजनेबाबत विचारणा केल्यानंतर राशिनकरने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, राशिनकरने या पैशांतून कल्याणीनगर भागातील एका मोटार विक्रेत्याकडून दोन महागड्या मोटारी विकत घेतल्या. खोमणे यांनी आरोपी राशिनकर, लोंढे आणि कोकणे यांच्याकडे पैशासाठी पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. खोमणे यांनी नुकतीच या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हे प्रकरण पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपविण्यात आले. राशिनकरला अटक करण्यात आली असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.