वाहकालाच मारहाण करत दाखवली मर्दानगी; पोलिसांच्या हस्तक्षेपाने पडला पडदा
सातारा,दि. 13 (प्रतिनिधी)
वर्दळीचे ठिकाण असल्याने सातारा बसस्थानकाला मारहाणीच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र, बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या मारहाणीमुळे बस स्थानकात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एखाद्या चित्रपटातील गुंडाला पोलीस ठाण्यात ज्या पध्दतीने मारहाण केल्याचे दाखवले जाते अगदी तसेच किंबहुना त्यापेक्षा मोठ्या जोशात वाहकाला मारहाण करून एसटीच्या एका अधिकाऱ्याने आपली मर्दानगी दाखवली. त्यात बघ्यांची गर्दी जमल्याने तर या महाशयांना जास्तच बळ आल्याचे दिसून आले.
त्याचे झाले असे की, बुधवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मुंबई ड्यूटी संपल्यानंतर एक वाहक त्याच्या गावी निघाला होता. त्याने मद्यपान केले होते. गावी जाणाऱ्या बसमध्ये बसल्यानंतर त्या वाहकाचा एका प्रवाशासोबत अन् नंतर त्याच बसच्या वाहकासोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी बस स्थानकातील एका सहाय्यक वाहतूक निरीक्षकाला पाचारण करण्यात आले.
चमकोगिरीची एकही संधी न सोडणाऱ्या साहेबांनी हात मागे सारूनच त्या बसकडे धाव घेतली. दोन्ही वाहकांच्यात सुरू असलेला वाद थांबवून नियमाप्रमाणे मद्यपान केलेल्या वाहकाची चूक गृहित धरून त्याच्या गचांडीला धरूनच साहेबांनी बस स्थानकातील पोलीस चौकीच्या दिशेने कूच केली. मात्र, गोंधळामुळे जमलेली बघ्यांची गर्दी पाहून त्या वाहकाला पोलीस चौकीत आणेपर्यंतही साहेबांना कळ निघाली नाही.
साहेबांनी लागलीच गंचाडी धरलेल्या वाहकाच्या श्रीमुखात लागावली. त्यानंतर ते महाशय थांबतील असे वाटत असतानाच त्यांच्यातील साहेब जागा झाला. त्यांनी लागलीच शेजारी पडलेल्या दांडक्याने वाहकाच्या पायावर, पाठीवर मारहाण केली. त्यानंतर बिचाऱ्या वाहकाने “साहेब, तुम्ही मला मारहाण करू नका. पोलीस बघतील कुणाची चूक आहे ते, अशी विनंती केली. त्यामुळे साहेब अजून भडकले.
“मला उलटा बोलतो काय,’ असे म्हणून पुन्हा मारहाण करण्यास सुरूवात केली. चारचौघात आपली अब्रू जात असल्याचे बघून तो वाहक मिटवून घेत होता. मात्र, वाहकाच्या विनंतीच्या सुराला त्याची मजबुरी समजून साहेबांनी बस स्थानकात जमलेल्या बाय- बापड्यांच्या पुढे आपली मर्दानगी दाखवलीच. शेवटी पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून प्रकरणावर पडदा टाकला.
मारहाणीनंतर श्रमपरिहार
वाहकाला चारचौघात मारहाण करून दमलेल्या त्या साहेबांनी बस स्थानकात श्रमपरिहारसुध्दा केला. मारहाण करून झाल्यानंतर लागलीच तिथेच एक चहा बेत आखत त्या साहेबांनी या ठिकाणी आपणच सर्वात मोठा साहेब असल्याचा भास निर्माण केला. मात्र, पहिल्यापासून घटनाक्रम पाहणाऱ्या प्रवाशांनी करायची ती छी-थू केलीच.
वाहकाची चूकच… पण शिक्षा कोणी करायची?
संबंधीत वाहकाने सार्वजनिक ठिकाणी दारुच्या नशेत घातलेला गोंधळ हा कारवाईयोग्य आहेच पण ती कारवाई करण्यासाठी बस स्थानकात पोलीस चौकी दिली आहे. चौकीत या प्रकरणावर तोडगा निघालाच असता मात्र, केवळ चमकोगिरी करण्याच्या हव्यासापोटी चारचौघात अशी मारहाण करणे तरी कोणत्या कायद्यात बसते. या घटनेबद्दल विचारणा करण्यासाठी जिल्हा नियंत्रक सागर पळसुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन कट करणेच पसंत केले.