पुणे – पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर फर्गसन महाविद्यालयातील विलगीकरण कक्षाचा प्राधान्याने वापर करू, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सध्या सीओईपी आणि बाणेर येथील जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी प्राधान्याने मनुष्यबळ उभे करण्यात येत आहे. तेथे डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय स्टाफची जमवाजमव करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे दोन्ही हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर अन्य ठिकाणी मनुष्यबळाची पूर्तता करण्याकडे लक्ष देण्यात येणार आहे.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती या मंडळांनी एकत्रितपणे फर्गसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड मुक्ती केंद्र उभारून तेथे रुग्णांची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली होती.
या ठिकाणी 400 रुग्णांसाठी आवश्यक बेड आणि त्यामध्ये 20 ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली होती. तसेच काही तज्ज्ञांची व्यवस्थाही येथे करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. याठिकाणचे हे सेंटर महापालिकेच्या सहकार्याने चालवले जाणार होते. मात्र अद्याप महापालिकेने येथे काहीच केले नाही, हे सेंटर कधी सुरू होणार याबाबत अनेकांकडून विचारणा होत आहे.
मात्र या ठिकाणी देण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ महापालिकेकडे नाही. सध्या सीओईपी आणि बाणेरमधील जम्बो कोविड हॉस्पिटलची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर अन्य सामाजिक संस्था किंवा मंडळांनी जोडून दिलेल्या व्यवस्था प्राधान्याने सुधारण्याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.