मुंबई : बॉलीवूडमध्ये 70 ते 80च्या दशकात हॉरर चित्रपटांचे स्थान निर्माण करून चित्रपटगृहात प्रेक्षकांना धडकी भरवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम रामसे यांचे निधन झाले. ते 67 वर्षाचे होते. बुधवारी सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्याम रामसे हे न्युमोनियाच्या व्याधीने त्रस्त होते. त्यांना मुंबईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले, असे अमित रामसे यांनी सांगितले.
भयपटांचे गारूडी अशी रामसे बंधूंची ओळख होती. त्यापैकी श्याम रामसे एक होते. 70 आणि 80च्या दशकात भारतीय सिनेरसिकांना घाबरगुंडी उडवणाऱ्या भयपटाचा अनुभव रामसे बंधूनी दिला. दूरदर्शनच्या आगमनानंतर पहिल्यांदा रामसे बंधूनी भूत, आत्मा या गोष्टी पडद्यावर आणल्या. यात श्याम रामसे यांचेही मोठे योगदान आहे. श्याम रामसे यांनी अंधेरा (1975), सबूत (1980), पुराना मंदिर (1984), पुरानी हवेली (1980), कोई है (2017), वीराना, बंद दरवाजा आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.
श्याम यांनी त्यांचे बंधू तुलसी रामसे यांच्यासोबतीने भारतीय दूरचित्र वाहिन्यांवर हॉरर शैलीच्या मालिका आणल्या. 1993 ते 2001 पर्यंत चाललेली झी हॉरर शो ही त्यांनी भारतीय वाहिन्यांवर आणलेली पहिली मालिका ठरली. श्याम रामसे हे त्यांच्या दोन मुली साशा आणि नम्रता यांच्यासह राहत होते. गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये त्यांचे बंधू तुलसी रामसे यांचे निधन झाले होते.