कराड – लॉकडाऊन शिथील झाल्याने तालुक्याच्या ठिकाणी आपल्या विविध कामांसाठी नागरिक गर्दी करत आहेत. विशेष करून येथील पंचायत समिती व नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू झालेल्या तहसील, प्रांत कार्यालयात शासकीय कामासाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे पोलीस उपविभागीय कार्यालय ते शाहू चौक परिसरातील वनवे असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे पार्किंग केले जात आहे. तर या कार्यालयात येणारे लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते, अनेक बड्या हस्ती त्यांची चारचाकी वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत.
कराड तालुक्याची उत्तर आणि दक्षिण अशी भौगोलिक विभागणी आहे. मात्र, शासकीय कामासाठी तसेच येथील बाजारपेठेत दोनही विभागातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. याशिवाय कराड शहरात दवाखाने, होलसेल व रिटेलर धान्य, भाजीपाला, कापड, बॅंका, पतसंस्था आदींच्या आस्थापना असल्याने कराड शहरात तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांचा राबता मोठा आहे.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च माहिन्यापासून लॉकडाऊन आहे. याकाळात जिल्हा, तालुका व गावबंदी असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील दळणवळण ठप्प झाले होते. काही अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सुरू होत्या. या सेवेतील वाहने वगळता सर्व वाहतूक बंद होती. त्यामुळे कराड शहरातील गर्दीची ठिकाणे असलेली शासकीय कार्यालये, बाजारपेठा बंदच होत्या. याचा सर्वात मोठा परिणाम दळणवळणावर झाला.
लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता आणत संपूर्ण अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. याचा एक भाग म्हणून टप्प्या-टप्प्याने अनेक व्यवहार सुरू होत आहेत. दि. 8 जूनपासून कंटेनमेंट व मायक्रो कंटेन्टमेंट झोन वगळून जिल्ह्यांतर्गत सर्व कामकाज सोशल डिस्टन्सिंग नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारी कराड शहरात नेहमीप्रमाणे रहदारी दिसून आली. तर येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील व प्रांत कार्यालयाचे काम सुरू झाल्याने हा परिसर गर्दीने फुलून गेला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेली शासकीय कामे करून घेण्यासाठी नागरिक मोठी गदी करत आहेत.
नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात रेव्हिन्यू कल्ब, पंचायत समिती, पोलीस उपविभागीय कार्यालय तसेच अनेक बॅंका, पतसंस्था आदी खासगी आस्थापनांची कार्यालये आहेत. त्यामुळे येथील पार्किंगची समस्या आवासूून उभी आहे. येथील कार्यालयात येणारे नागरीक आपली दुचाकी व चारचाकी वाहने पोलीस उपविभागीय कार्यालय ते शाहू चौक या वनवे असलेल्या मार्गावर रस्त्याच्या दुर्तफा जागा मिळेल, त्याठिकाणी लावत आहेत. काही लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते नवीन प्रशासकीय इमारत तसेच पंचायत समितीच्या संरक्षण भिंतीलगत आपली वाहने लावत आहेत. अनेक वाहने रस्त्याच्या मध्यावरच उभी केलेली दिसत आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीचा पुरता खेळखंडोबा झाला आहे.
नो पार्किंग झोनची मागणी…
नवीन पोलीस उपविभागीय कार्यालय ते शाहू चौक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जुन्या तहसील कार्यालयापासूनचा आहे. या परिसरात नव्याने पोलीस उपविभागीय कार्यालय, जिल्हा कृषि व प्रशासनाची अन्य कार्यालये, प्रांत, तहसील, पंचायत समिती कार्यालय यांची भर पडली आहे. त्यामुळे या परिसरात वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यासाठी पोलीस उपविभागीय कार्यालय ते शाहूचौक मार्गावर दुर्तफा नो पार्किंग झोन करावा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
पोलीस कारवाई करणार का ?
वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम शहरातील वाहतूक पोलीस यंत्रणेचे आहे. ही कामगिरी ते शहरात प्रभावीपणे करताना दिसून येत आहेत. मात्र, पोलीस उपविभागीय कार्यालय ते शाहूचौक परिसरात वाहतूक पोलिसांची कारवाई होताना दिसत नाही. येथील बेशिस्तपणे पार्किंग करण्यात आलेली वाहने ही लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते तसेच बड्या हस्तींची असतात. त्यामुळे येथे वाहतूक शाखा काय कारवाई करणार? त्यांच्या गाड्या क्रेनने ओढून नेणार? की दंड वसूल करणार? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.