पुणे : मध्य रेल्वेकडून लोणावळा ते कर्जत या दरम्यान वीज आईनं रुळांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी पुढील दहा दिवस प्रगती एक्सप्रेससह अन्य काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-कोल्हापुरकोयना एक्सप्रेस पुण्यापर्यंत असेल.
अन्य काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या तर काहिंचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांपुर्वी घाट क्षेत्रातील रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी डागडुजी केलेल्या कामांवर हात फिरवणे आवश्यक आहे. याशिवाय या भागात आणखी काही कामे करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे-मुंबईदरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस पुर्णपणे तर मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस अंशत: रद्द करण्यात आली आहे. यांसह दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रगती एक्सप्रेस दि. १५ आॅक्टोबरपर्यंत धावणार नाहीत. तर पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी दि. ५ ते १४ आॅक्टोबर या कालावधीत दौंड-मनमाडमार्गे धावेल.
कोल्हापुर-मुंबई कोयना एक्सप्रेस ही गाडी दि. १४ आॅक्टोबरपर्यंत पुण्यापर्यंत धावेल. ही गाडी नंतर पुण्यातून सोडण्यात येईल. मुंबई ते पुणे यादरम्यान गाडी धावणार नाही. तसेच हुबळी-मुंबई-हुबळी (दि. ५ ते १४), हैद्राबाद-मुंबई-हैद्राबाद (दि. ७ ते १५), विशाखापट्टण-मुंबई (दि. ५ ते १४), नांदेड-पनवेल-नांदेड (दि. ६ ते १५) या गाड्यांही पुण्यापर्यंतच धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.