पुणे : कोकणात आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. सध्या पूरस्थिती ओसरली असली, तरी या भागात स्वच्छता तसेच इतर कामांसाठी स्थानिक नागरिकांना मदतीची गरज आहे. त्यानुसार नुकतेच पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महाड तालुक्यातील पूरग्रस्त भागात मदतकार्य व श्रमदान करण्यात आले. पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाड तालुक्यातील कुंभेशिवथर घळ, कसबे शिवथर व आंबे शिवथर या गावांत अन्नधान्य, कपडे, भाजीपाला व औषधे अशा आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, साहित्य संकलन केंद्राकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले. तसेच, राजेवाडी गावात श्रमदानाच्या माध्यमातून गावाची सफाई करण्यात आली व जंतूनाशक पावडर फवारण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या पथकाने ही स्वच्छता मोहीम राबविली.
तसेच राजेवाडीतील ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. हे गाव पूरामध्ये 14 फूट पाण्याखाली होते. या वेळी ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आवश्यकता व स्वच्छतेसाठी म्हणून पुढील आठवड्यात पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे टॅंकर, जेसीबी, जेटिंग मशीन, सॅनिटायझर आणि आवश्यक औषधे पाठविण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त भागासाठी पुणेकरांकडून मोठया प्रमाणात मदत करण्यात येत असून आणखी नागरिकांनी पुढे यावे असे आवहनही त्यांनी केले आहे.