संतोष पवार
सातारा – सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या पदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यमान अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
ज्येष्ठ नेते मानसिंगराव जगदाळे यांची संधी गतवेळी थोडक्यात हुकली होती. त्यामुळे तेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पक्षश्रेष्ठी पुन्हा संजीवराजे यांना संधी देणार की, अध्यक्षपदाची माळ मानसिंगराव जगदाळे यांच्या गळ्यात घालणार, याची उत्सुकता आहे. शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार, सुरेंद्र गुदगे यांचीही नावे चर्चेत असून अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा परिषदेत 64 सदस्यांपैकी 39 सदस्य सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असून तरडगाव गटातून निवडून आलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पहिली अडीच वर्षे अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. उपाध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक वसंतराव मानकुमरे यांना शिक्षण समितीच्या सभापतिपदी राजेश पवार, कृषी समितीच्या सभापतिपदी मनोज पवार, समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी सर्वगौड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी वनिता गोरे यांना संधी मिळाली होती.
आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात विद्यमान पदाधिकाऱ्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन उल्लेखनीय काम केले. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून संजीवराजे यांनी जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत 21 सप्टेंबर रोजी संपणार होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांना चार महिने मुदतवाढ मिळाली होती.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी मंत्रालयात झाली. या सोडतीत सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद पुन्हा एकदा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी संजीवराजे यांना पुन्हा संधी देणार की, समतोल राखण्यासाठी मानसिंगराव जगदाळे, राजेश पवार, सुरेंद्र गुदगे यांच्यापैकी एकाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजीवराजे यांनी जिल्हा परिषदेत आदर्श काम केले आहे. फलटण विधानसभा मतदारसंघात आ. दीपक चव्हाण यांच्या हॅट्ट्रिकमध्येही संजीवराजे यांचा मोलाचा वाटा आहे. संजीवराजे यांच्यासाठी ही जमेची बाजू असून पक्षश्रेष्ठी त्यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वपक्षीय सदस्यांना बरोबर घेऊन संजीवराजे यांनी विकासाचा समतोल राखला आहे. त्यांच्या शांत व संयमी स्वभावामुळे प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्यात सुसंवाद होता. आगामी काळात जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट करण्यासाठी संजीवराजे यांना पुन्हा संधी मिळू शकते, असे जाणकारांचे मत आहे.
मसूरचे ज्येष्ठ नेते मानसिंगराव जगदाळे यांना अडीच वर्षांपूर्वी संधी मिळणार, हे जवळपास निश्चित असताना ऐनवेळी संजीवराजे यांची वर्णी लागली होती. त्यामुळे यावेळी जगदाळे यांना निष्ठा व प्रामाणिकपणाचे फळ मिळणार का, हा प्रश्न आहे. जगदाळे यांनी गेली कित्येक वर्ष पक्ष बळकटीसाठी काम केले आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांचा परिचय आहे.
त्यामुळे जगदाळे यांच्या निवडीची शक्यताही नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे राजेश पवार यांना अध्यक्षपदी संधी देऊन पाटण तालुक्यात पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. जिल्हा परिषद सभागृहाचा गेली कित्येक वर्षे अनुभव असलेले अभ्यासू सदस्य सुरेंद्र गुदगे यांनाही अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. गुदगे यांनी पक्षाच्या धोरणांना अननुसरून चांगले काम केले आहे. जिल्हा परिषदेत विविध विषयांवर आवाज उठवून त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सद्य स्थितीत संजीवराजे व मानसिंगराव जगदाळे यांचीच नावे चर्चेत आहेत.
उपाध्यक्ष, सभापतिपदांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गज असून उपाध्यक्ष व सभापतिपदांसाठीही इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. मनोज पवार, मंगेश धुमाळ, प्रदीप विधाते, रमेश पाटील, शिवाजी सर्वगौड, बापूसाहेब जाधव, जयवंत भोसले, डॉ. भारती पोळ, दीपाली साळुंखे, अर्चना रांजणे, संगीता मस्कर आदींनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे उपाध्यक्षपद व सभापतिपदे कोणाला मिळणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.