वनाज कचरा डेपो महावितरणची थकबाकी भरण्याचे पालिकेला पत्र
पुणे – महापालिकेच्या मालकीच्या कोथरूड कचरा डेपोच्या जागेत आता वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचा डेपो उभारण्यात येणार आहे. या डेपोचे काम महामेट्रोला सुरू करायचे आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या महापालिकेची जुन्या वीज मीटरची थकबाकी असल्याने महावितरणने मेट्रोला वीज जोड देण्यास संमती दिली असली तरी आधी ती भरण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तातडीने ही थकबाकी भरावी, अशी विनंती महामेट्रोने पत्राद्वारे पालिकेकडे केली आहे. दरम्यान, या डेपोतील मीटर तसेच किती थकबाकी आहे याची कोणतीही माहिती पालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे प्रशासनाकडूनही सुमारे 30 वर्षांपूर्वी असलेल्या या डेपोच्या वीज बिलांची माहिती तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
महामेट्रोच्या वजान ते रामवाडी या मार्गाचा डेपो या जागेवर असणार आहे. सुमारे 27 हेक्टर जागेवर हा डेपो असून तो वापरात नाही. त्यामुळे ही जागा सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने महामेट्रोकडे हस्तांतरीत केली आहे. त्यावर ताबा घेऊन महामेट्रोने काम सुरू केले आहे. या डेपोच्या ठिकाणाहून मेट्रोचे सर्व संचलन चालणार असल्याने महामेट्रोने महावितरणकडून उच्च क्षमता असलेली वीज जोडणीची मागणी केली असून ते देण्यास महावितरणने संमतीही दिली आहे.
मात्र, ही जागा महापालिकेच्या नावावर असल्याने महावितरणने महापालिकेची या ठिकाणच्या असलेल्या मीटरची थकबाकी भरण्याची मागणी महामेट्रोकडे केली आहे. त्याताच आता महामेट्रोला डेपोच्या बांधकामाला सुरुवात करायची असल्याने महापालिकेने तातडीने महावितरणची थकबाकी भरावी, त्यामुळे महावितरणकडून पुढील कार्यवाही करणे सोपे जाणार असल्याचे पत्र महापालिकेच्या विद्युत विभागास पाठविण्यात आले आहे.