पुणे – बायकोला टीबी झाल्याने घरात सातत्याने होणाऱ्या कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोचा गळा दाबून व जमिनीवर डोके आपटून खून केला. वडगाव गावठाणमध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन गवते यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत सोनाली बाबू शेख (30, आईनगर झोपडपट्टी) हिचा मृत्यू झाला आहे.
बाबू राजू शेख (34) याला अटक केली आहे. 1 जून रोजी रात्रीच्या वेळी आईनगर झोपडपट्टी, वडगाव गावठाण येथे हा प्रकार घडला. सोनाली हिला तिचा पती बाबू शेख टीबीचा आजार असल्याने मारहाण करीत होता. यातून कौटुंबिक वाद होऊन त्याचे पर्यवसान भांडणात झाले. त्या भांडणाच्या रागातून त्याने सोनालीला मारहाण केली. तिचा गळा दाबून तिचे डोके जमिनीवर आपटून खून केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शेखर शिंदे पुढील तपास करीत आहेत.