पुणे – राज्य शासनाने दस्त नोंदणीमध्ये मुद्रांक शुल्कात विशेष सवलत दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज वाढलेले आहे. मुद्रांक शुल्क सवलतीचा सर्वसामान्य जनतेला लाभ घेता यावा, यासाठी जिल्ह्यातील 21 दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारीदेखील सुरू राहणार आहेत.
या निर्णयानुसार दि.12, 19,26 (शनिवार) आणि ख्रिसमसची (दि.25) सरकारी कार्यालयांना सुट्टी असली, तरी दुय्यम निबंधक कार्यालये सुरु राहणार आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप पाटील यांनी दिली.
सह दुय्यम निबंधक बारामती, सह दुय्यम निबंधक बारामती क्र.-2, आंबेगाव, भोर, दौंड, इंदापूर, नारायणगांव, केडगांव, खेड, क्र.1, 2, 3, लोणावळा, मावळ, मावळ क्र.2 मुळशी, मुळशी क्र.2, जुन्नर, पुरंदर, शिरुर, तळेगांव ढमढेरे, वेल्हा ही कार्यालये सुरू राहणार आहेत.
नागरिकांनी शासनाने दिलेल्या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.