राजगुरुनगर -पाडळी (ता. खेड) येथे 75 वर्षीय वृद्ध महिलेला देवाला फुले वाहण्यास सांगून तिच्या गळ्यातील दिड तोळे सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी हातोहात लांबविले. ही घटना गुरुवारी (दि. 26) दुपारी घडली. याबाबत खेड पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळसाबाई महादु भागडे (वय 75, रा. पाडळी) या वाडा रोडलगत दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शेतात शेळ्या चारत होत्या. राजगुरुनगरच्या बाजूने दोन युवक मोटारसायकलवर आले. भागडे या महिलेल्या जवळच असलेल्या कानिफनाथ मंदिरातील देवाला पूजा, हार, फुले वाहायची आहेत. देवाची पूजा करा असे सांगून या युवकांनी महिलेचा विश्वास संपादन केला.
महिलेच्या हातात युवकांनी हार, फुले, उदबत्ती, नारळ यांची पिशवी देऊन मंदिरात घेऊन गेले. महिला देवाची पूजा करण्यासाठी वाकल्या असता दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीचे दिड तोळ्याचे सोन्याचे दागिने काढून घेतले व मोटार सायकलवर बसून तेथून पसार झाले. हे लक्षात आल्यानंतर तुळसाबाई भागडे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.