पुणे -शहरात गेल्या 24 तासांत नव्याने 295 करोनाबाधित सापडले, तर 20 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहर हद्दीतील 9 तर अन्य विभागातील 11 जणांचा समावेश आहे, तर आज दिवसभरात 321 बाधित करोनामुक्त झाले. दरम्यान, बुधवारच्या आकडेवारीनुसार नव्या करोनाबाधितांचा दर म्हणजेच पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांजवळ म्हणजेच 4.96 टक्के इतका असल्याचे समोर आले आहे.
“शहरातील करोनाबाधितांचा दर 5 टक्क्यांपुढे गेला, तर पुन्हा कठोर निर्बंध लावण्यात येतील,’ असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी दिला आहे. पण, गेल्या काही दिवसांतील शहरात वाढती गर्दी लक्षात घेता, बुधवारच्या पॉझिटिव्हिटी रेटचा आकडा धडकी वाढवणारा ठरला आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन गरजे गरजेचे आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात दीडशे ते दोनशेच्या आसपास असलेली दररोजची नव्या बाधितांची संख्या आता पुन्हा 300 च्या जवळ आली आहे. बुधवारी दिवसभरात 5 हजार 958 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. आतापर्यंत 25 लाख 92 हजार 920 जणांच्या तपासणीतून 4 लाख 74 हजार 840 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
म्हणजेच शहराचा एकूण बाधित दर 18.31 टक्के आहे. शहरात आजची सक्रिय बाधित संख्या 2 हजार 738 इतकी असून, त्यातील 451 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 703 जण ऑक्सिजन लावण्यात आला आहे. आतापर्यंत 4 लाख 63 हजार 601 जण करोनामुक्त झाले असून, करोनामुक्तीचा दर 97.64 इतका आहे. तर मृत्यू दर 1.79 टक्के इतका आहे.