- चोरांना पकडण्यात अपयश ः गुन्हे शोधाचे प्रमाणही घटले
पिंपरी – सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पोलीस उपाययोजना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी शहरतील सोनसाखळी चोरीचे 53 ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहर व आसपासच्या परिसराचा विस्तार खूप मोठा असल्याने आणि वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. परंतु स्वतंत्र आयुक्तालय स्थापन झाल्याने गुन्हेगारी संपुष्टात आली नाही मात्र गुन्हेगारांना शोधून गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण घटले. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे शोधाचे प्रमाण तब्बल 12 टक्क्यांनी घटून ते 49 टक्क्यांवर आले आहे. याचाच अर्थ की निम्म्याहून अधिक सोनसाखळी चोर पोलिसांच्या हाती लागत नाहीत.
तीन वर्षांपूर्वी शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. एकाच वेळी पाच ते सहा सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. यामुळे पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने हद्दीबाहेर जात इराणी सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. एवढ्यावरच पोलीस थांबले नाहीत तर अनेक टोळ्यांना त्यांनी मोक्का लावल्याने सध्या ते तुरूंगात आहेत. सोनसाखळी चोरीच्या या प्रकाराला थोडासा आळा बसला असला तरी हे प्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही बाब गांभिर्यांने घेतली आहे. कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठे सोनसाखळी चोरी होते याचा अभ्यास करून शहरातील 15 पोलीस ठाण्यांमधील 53 सोनसाखळी चोरीचे ब्लॅकस्पॉट पोलिसांनी काढले आहेत. नुकत्याच झालेल्या क्राईम मिटींगमध्ये या 53 ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याची सूचना वरिष्ठ स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महिला आणि वृद्ध टार्गेट
सोनसाखळी चोरीला बळी पडलेल्यांमध्ये 80 टक्के महिला आणि 20 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. महिला आणि वृद्ध हे चोरट्यांना प्रतिकार करण्यास कमी पडतात. यामुळेच चोरटे त्यांना टार्गेट करतात. यामुळे त्यांनी सोन्याचे दागिने घालून जाण्यापूर्वी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
जनजागृती करणे गरजेचे
सध्या शहरात इंद्रायणी थडी पार पडली. तर आगामी काळात गावजत्रा, पवनाथडी आदी जत्रेचे आयोजन केले जाणार आहे. या जत्रेला येणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणी पोलिसांनाकडून महिलांमध्ये सोनसाखळीच्या विरोधात जनजागृती करणे आवश्यक आहे. इंद्रायणीथडीत ही संधी गमावलेल्या पोलिसांनी आगामी काळात लक्ष देण्याची गरज आहे. तसेच सणासुदीच्या काळात पोलिसांनी आपल्या वाहनातून गस्त घालतानाही ध्वनिक्षेपकावरून जनजागृती करणे गरजेचे आहे.
चोरटेही झाले हायटेक
तांत्रिक बाबींचा आधार घेत अनेकदा पोलीस चोरट्यांच्या मुसक्या आवळतात. हे आता गुन्हेगारांनाही माहिती पडले आहे. त्यामुळे ते आपसातील संवादासाठी नवनवीन युक्त्या काढत आहेत. याच आठवड्यात सांगवी पोलिसांनी अटक केलेले सोनसाखळी चोरटे आपसातील संवादाकरिता पब्जी गेमचा वापर करीत असल्याचे दिसून आले.
म्हणून सांगवी पोलिसांना केले टार्गेट
दोन वर्षापूर्वी सांगवी पोलिसांनी एका सोनसाखळी चोरट्याला जेरबंद केले होते. याचा राग त्या चोरट्याच्या मनात होता. त्यामुळे तुरूंगातून बाहेर आल्यावर त्याने फक्त सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सोनसाखळी चोऱ्या केल्या. मात्र याही वेळेस त्या चोरट्याला सांगवी पोलिसांनीच जेरबंद केले.