- अधिकारी, नेते मंडळींचा भुरटेपणा
- कार्यकाळ संपल्यानंतर 101 जणांनी मोबाइल घातले खिशात
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या पैशांतून खरेदी केलेल्या मोबाइलवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ वर्षात शंभरहून अधिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भांडार विभागाकडे मोबाइल जमा केले नाहीत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेले मोबाइल पदाधकिऱ्यांनी लंपास केले असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये सुमारे 20 लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. यानिमित्ताने जनतेच्या कररुपी पैशांने भरलेल्या महापालिकेच्या तिजोरीवर पदाधिकारी व अधिकारीच डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत आता लाखो रुपयांचा मोबाइल खरेदी घोटाळा उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील महापौर, उपमहापौर, सत्तारुढ पक्षनेता, स्थायी सभापती, विरोधी पक्षनेता, विधी सभापती, शहर सुधारणा सभापती, महिला व बालकल्याण सभापती, शिक्षण सभापती, जैवविविधता सभापती यांच्यासह आठ प्रभागांतील सर्व अध्यक्षांना महापालिकेकडून विविध सोयी-सुविधा देण्यात येतात. त्यात त्या पदाधिकाऱ्यांना मोबाइल देखील देण्यात येतो.
मात्र, अनेकदा जुना वापरलेला मोबाइल पदाधिकारी अथवा वरिष्ठ अधिकारी घेत नाही. त्यामुळे सर्वांना नवीन मोबाइल खरेदी करुन द्यावा लागतो. परंतू, त्या पदाचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर मोबाईल जमा करुन घेण्याची जबाबदारी त्या विभागाची आहे. त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे.
सगळे सारखेच…
नगरसेवक पदासाठी कोट्यवधी रुपये खर्चून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी महापालिकेचे घेतलेले मोबाइल अद्याप जमा केलेले नाहीत. जनतेच्या कररुपी पैशातून या मोबाइलची खरेदी झालेली असून पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदावरुन खाली उतरताच आपआपले मोबाइल जमा करणे अपेक्षित असते, परंतु तत्त्व आणि प्रामाणिकची भाषणे ठोकणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचा मोबाइल देखील सोडला नाही. मोबाईलवर डल्ला मारलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि विद्यमान भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे अशा प्रकारची सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून आली आहे.
फक्त 54 जणांनी दाखविला प्रामाणिकपणा
महापालिकेच्या भांडार विभागाने सन 2012 पासून आजपर्यंत साधारणपणे 30 लाख 38 हजार 480 रुपयांचे 155 मोबाईल खरेदी केलेले आहेत. हे मोबाइल ब्लॅकबेरी, सॅमसंग या कंपन्याचे आहेत. त्यातील भांडार विभागाकडे आतापर्यंत फक्त 54 मोबाईल जमा केलेले आहेत. उर्वरित 101 मोबाईल अजूनही भांडार विभागाकडे जमा न केल्यामुळे सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परस्पर लंपास केला असल्याचे समोर आले आहे.
श्रीमंत महापालिकेतील लाजिरवाणी गोष्ट
पिंपरी चिंचवड महापालिका ही सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून नावारुपास आलेली आहे. मात्र या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा भुरटेपणा लाजिरवाणा आहे. नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवार कोट्यवधी रुपयांचा खर्च करतात. मोबाइल लंपास करणाऱ्या अनेक नगरसेवकांची मालमत्ता कोटीच्या घरात आहे. शहरातील काही नगरसेवकांचा रुबाब तर आमदार, खासदारांना लाजवेल अशा स्वरुपाचा असतो. मात्र अशा श्रीमंत महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी जनतेच्या खर्चातून खरेदी केलेल्या मोबाइलवर मारलेला डल्ला लज्जास्पद आहे.