- शहरातील रुग्णांची संख्या घटतेय ; नव्या 784 रुग्णांची भर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र वाढू लागले आहे. गेल्या 24 तासांत 30 जणांचा मृत्यू झाला असून नव्या 784 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या पाच दिवसांपासून बाधितांचा आकडा एक हजाराच्या आतमध्ये राहिला आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाण घटण्याची बाब सकारात्मक असली तरी मृतांचा वाढता आकडा चिंताजनक मानला जात आहे.
बुधवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 784 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बाधितांची संख्या 73 हजार 260 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 16 जण शहरातील असून 14 जण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1206 वर पोहोचला असून शहराबाहेरील 412 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 1618 ची संख्या आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील थेरगाव, कासारवाडी, मोशी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, निगडी प्राधिकरण, चिंचवड, दिघी, पिंपळे गुरव येथील 16 जणांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील वडगाव शेरी, हडपसर, धनकवडी, विठ्ठलवाडी, जुन्नर, वारजे, पाषाण, खेडशिवापूर, करमाळा, देहूरोड, आळंदी, खंडाळा येथील 14 जणांचा समावेश आहे.
आतापर्यंत शहरातील 59 हजार 544 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 4270 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात 1559 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 1637 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 3566 जण महापालिकेच्या विविध रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 5063 आणि शहराबाहेरील 1135 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.