प्रशासनाकडून निविदा प्रसिद्ध; समांतर पूल उभारला जाणार
पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी) – अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यान उभारण्यात येणार्या संमातर पुलाचा विषय अखेर मार्गी लागला असून या पुलाची निविदा महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडे अडीच वर्षांपासून पाठपुरावा करणार्या नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या प्रयत्नालाही यश आले आहे.
महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यानच्या नदीवरील समांतर पुलाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. पिंपरीतील नगरसेवक संदीप वाघेरे हे या पुलाच्या कामासंदर्भात अडीच वर्षांपासून आयुक्त आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून सदर काम तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. स्थापत्य विभागामार्फत या पुलाची 12 कोटी 56 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर निविदेची ‘प्री बीड मीटिंग’ 7 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असून निविदा भरण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी असणार आहे.
यासंदर्भात बोलताना नगरसेवक वाघेरे म्हणाले की, गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, काटे पिंपळे या गावांमधील लोकवस्ती आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्याअनुषंगाने वाहनांच्या रहदारीमध्येही वाढ झाल्यामुळे या गावांना जोडणारा जुना पूल अपुरा पडत होता. त्यातच पुलाचीही दुरावस्था झाल्याने वाहनचालकांना धोकादायक पद्धतीने वाहन चालवावे लागत होते. तसेच या पुलावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याने त्याचा मनस्ताप वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत होता. परंतु आता लवकरात लवकर सदर समांतर पुल उभारण्यात येईल व त्यामुळे या सर्व समस्या मार्गी लागतील.
पुलाला प्रेक्षा गॅलरी
सदर पुलास 6 मीटर बाय 14 मीटरची प्रेक्षा गॅलरी करण्यात येणार आहे. प्रेक्षक गॅलरी असणारा पिंपरी चिंचवड शहरातील हा पहिलाच पूल ठरणार आहे. सिंधी समाजातील संत झुलेलाल यांना माननारा मोठा वर्ग नदीतील माशासाठी अन्नदान करतो. या नागरिकांना अन्नदान योग्य पद्धतीने करता यावे, हा प्रेक्षागॅलरी मागील उद्देश आहे. नगरसेवक वाघेरे यांनी प्रेक्षागॅलरीची संकल्पना सूचविली होती.