पुणे – पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बीच्या दणदणाटाला रात्री बारानंतर मनाई आहे. मात्र, केळकर रस्त्यावर रात्री बारानंतर पारंपरिक वाद्येदेखील वाजविण्यास मनाई केल्याने पोलिसांच्या या भूमिकेचा निषेध करत अनेक मंडळांनी महापालिकेचे मानाचे श्रीफळ नाकारत मूक मिरवणूक काढली.
महापालिकेच्या वतीने माती गणपतीजवळ तर नारायण पेठ पोलीस चौकीजवळ या गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. गुरुवारी रात्री बारा वाजल्यानंतर पोलिसांनी गणेश मंडळांना डॉल्बीचा दणदणाट बंद करण्याच्या सूचना केल्या. मंडळांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन केले. त्यानंतर या रस्त्यावर एकदम शांतता पसरली. मात्र, त्याचवेळी मिरवणुकीतील मंडळांना पोलिसांनी आपला मोर्चा पारंपरिक वाद्य पथकांकडे वळविला.
रात्री बारानंतर पारंपरिक वाद्ये वाजविण्यासदेखील मनाई केल्याने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. शेवटी पोलिसांच्या या भूमिकेचा निषेध करत अनेक मंडळांनी महापालिकेच्या वतीने दिले जाणारे मानाचे श्रीफळ नाकारत मार्गक्रमण केले. एकीकडे केळकर रस्त्यावरील गणेश मंडळांना पारंपरिक वाद्ये वाजविण्यास पोलीस मनाई करत होते तर काही अंतरावर असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर पारंपरिक वाद्यांचा वापर होत असल्याचे परस्परविरोधी चित्र पहायला मिळाले.