चालकाच्या भावाची घेतली मदत; डिझेल ओतून स्वत:च पेटवली कार
सातारा, दि.3 (प्रतिनिधी)
शनिवार दि.27 रोजी माण तालुक्यातील पानवण येथून डॉ. नानासो शिंदे यांचे अपहरण झाल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर हे अपहरण जिल्हा बॅंक निवडणुकीच्या सोसायटी ठरावावरून झाल्याचे बोलले जात असल्याने जिल्हा पोलीस दल अलर्ट झाले होते. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे या अपहरण नाट्याने वेगळे वळण घेतले आहे. स्वत: डॉ. शिंदे यानेच त्याच्या गाडीवरील चालकाच्या भावाच्या मदतीने अपहरण केल्याचे समोर आल्याने माण तालुक्यातील राजकीय धुळवड शांत झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणुक लागली आहे. त्यासाठी गावोगावच्या सोसायट्यांमधून ठराव करून घेण्याची लगबग सुरू आहे. माण तालुक्यातील पानवण येथील सोसायटीचा ठराव डॉ. शिंदे याच्या नावाने केला होता. दरम्यान त्याचे अपहरण झाल्याच्या बातमीमुळे जिल्हा बॅंक निवडणुक माण तालुक्यातील जनतेच्या जिवाला घोर लावणार असे वातावरण झाले होते.
गावागावात याच अपहरणाची चर्चा सुरू होती. तर या चर्चेच्या मध्यभागी शिवसेना नेते शेखर गोरे यांचे नाव होते. मात्र, पोलिसांनी खासकरून जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील , डीवायएसपी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, मालोजीराव देशमुख यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तळ ठोकून परिस्थितीवर लक्ष ठेवले होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय तणाव वाढला जाईल अशी कृती पोलिसांकडून न होण्याची खबरदारी एसपी बन्सल यांनी घेतली होती.
त्यामुळे पोलिसांच्या भुमिकेवर तर्क वितर्क लावले जात असतानाच काहीजण तेल ओतण्याचे काम करत होते. मात्र, पोलिसांनी अतंत्य चाणाक्षपणे याप्रकरणात डॉ. शिंदेला बोलता करून अपहरण नाट्यावर पडदा टाकला आहे. शिंदे हा दि.27 रोजी त्याच्या गाडीवरील चालकाच्या भावाच्या दुचाकीवरून दिघंची (जि. सांगली) कडे गेला होता.
जाताना त्याने त्याच्याच गाडीत असलेल्या एक बॉटलमधील डिझेल ओतून स्वत:चीच गाडी पेटवून दिली. त्यानंतर दुचाकीवर बसून तो दिघंची येथील एका डॉक्टर मित्राकडे राहण्यास गेला. त्या मित्राने शिंदेची दिघंची येथील एका लॉजवर राहण्याची सोय केली होती.
मात्र, रविवारी वर्तमानपत्रातील व वृत्तवाहीन्यांवर डॉ. शिंदेच्या अपहरणाच्या बातम्या पाहून त्या मित्राने शिंदे याला दिघंची येथून हाकलून दिला. तिथून निघालेल्या शिंदे याने थेट सोलापूर जिल्ह्यातील पिलीव घाटाच्या खाली असलेले तांदुळवाडी गाठले व तिथे जाण्यापुर्वीच घरातून नेलेल्या काळ्या पट्टीने स्वत:चे डोळे व दोरीने हात बांधून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर स्थानिकांनी त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर म्हसवड पोलीस ठाण्यात माहिती दिली होती.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला होता. ताब्यातील डॉ. शिंदेकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने अपहरणाचा बनाव केल्याची कबुली दिली आहे.