पुणे – गेल्या दोन दिवसांपासून शहरात जोरदार हजेरी लावलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. मात्र, पाऊस थांबल्यानंतर 10 तासानंतरही शहराच्या विविध भागांमधील अनेक ठिकाणची ड्रेनेज ओव्हर फ्लो होऊन वाहत होती. या ड्रेनेजमधील पाणी रस्त्यांवरुन वाहत असल्याने पादचाऱ्यांबरोबरच वाहनचालकांना त्रास सहन कारावा लागत आहे.
शहर व जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. रात्री आठच्या सुमारास मेघगर्जेसह सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची मोठी त्रेधा उडवली. मध्यरात्रीपर्यंत बरसणाऱ्या या पावसामुळे शहरातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले होते. त्याचा दुचाकीस्वारांना मोठा फटका बसला.
दरम्यान, मध्यरात्री पाऊस थांबला तरीदेखील शहरातील अनेक ठिकाणची ड्रेनेज ओव्हरफ्लो होत आहेत. डेक्कनजवळ नदीपात्रातील खाऊगल्लीलगतची सर्वच ड्रेनेज बुधवारी दुपारपत भरभरुन वाहत होती. बाबा भिडेपुलाजवळच्या नदीपात्राला समांतर असलेल्या रस्त्यावर हे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते. त्यामुळे नागरिकांना फटका बसला.